Loksabha 2019 : कोण दुर्योधन अन् कोण अर्जुन कळेल 23 मेला : अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

- प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींची तुलना केली होती दुर्योधनशी.

-  त्याच मुद्द्यावरून अमित शहांनी साधला निशाणा.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली होती. त्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले, की 23 मेला समजेल की कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन. तसेच सध्या काँग्रेस नेत्यांकडून मोदीजींविषयी अपशब्दांचा वापर केला जात आहे, असेही ते म्हणाले. 

पश्चिम बंगालमधील बिशनपूर येथे आयोजित जाहीरसभेत अमित शहा बोलत होते. ते म्हणाले, सध्या देशाचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात असून, देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. दुर्योधनाचा अहंकारही अशाचप्रकारे गळून पडला होता. तसेच सध्या काँग्रेस नेत्यांकडून मोदीजींविषयी अपशब्दांचा वापर केला जात आहे. या माध्यमातून मोदीजींचा अपमानही होत आहे, आपण तो सहन करणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधताना अमित शहा म्हणाले, प्रियांकाजी, ही लोकशाही आहे. तुम्ही एखाद्याचा उल्लेख दुर्योधन म्हणून केला म्हणून ती व्यक्ती खरंच दुर्योधन ठरत नाही. त्यामुळे आता 23 मेला कळेल कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who Duryodhan and Arjun will know in the 23rd May says Amit Shah