'क्‍यार'चा हाहाकार; सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

क्‍यार चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा मालवण तालुक्‍याच्या किनारपट्टीला बसला. येथील मेढा-राजकोट, बंदर जेटी, दांडी, वायरी भूतनाथ, देवबाग, तळाशील, आचरा या भागामध्ये वादळामुळे निर्माण झालेल्या जबरदस्त उधाणाचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले. उधाणामुळे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसले. फयान वादळानंतर असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

मालवण : क्‍यार चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा मालवण तालुक्‍याच्या किनारपट्टीला बसला. येथील मेढा-राजकोट, बंदर जेटी, दांडी, वायरी भूतनाथ, देवबाग, तळाशील, आचरा या भागामध्ये वादळामुळे निर्माण झालेल्या जबरदस्त उधाणाचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले. उधाणामुळे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसले. फयान वादळानंतर असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात सर्वत्र दाणादाण उडाली आहे. 

किनारपट्टी भागास चक्रीवादळाचा धोका असताना बंदर विभागाकडून प्रवासी होडी व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची कल्पना अगर धोक्‍याचा बावटा समुद्रात लावण्यात न आल्याने व्यावसायिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. फयान वादळानंतर प्रथमच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून समुद्री लाटांचे पाणी आत घुसले. प्रवेशद्वारालगतच्या हनुमान मंदिरापर्यंत हे पाणी पोचले होते. समुद्रात मच्छीमारांना किनाऱ्यावर परतण्यासाठी मार्ग समजावा यासाठी टाकण्यात आलेली मार्गदर्शक पिंपेही या उधाणात वाहून गेली. 

- समुद्रातच नांगरलेली एक नौका व होड्या बुडाल्या 
- पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्या 
- मासेमारीही ठप्प झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर 
- दिवाळीच्या उत्साहावर विरजण 
- देवबागच्या किनारपट्टीवर पाणी वस्तीत घुसले 
 

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने समुद्रातील होड्या पुन्हा किनाऱ्यावर ओढण्यासाठी व्यावसायिकांचे हाल होत आहेत. बंदर विभागाने जर पूर्वसूचना दिली असती तर ही वेळ आली नसती. 
- मंगेश सावंत, अध्यक्ष, किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heav rain in Sindhudurg due to Cyclone Kyarr