Maratha Kranti Morcha: मराठा आंदोलकांचे अटकसत्र

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 August 2018

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलनाने राज्यभरातले व्यवहार रोखल्यानंतर आता सरकारने कठोर कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. या आंदोलनात हिंसक घटना घडलेल्या भागात आंदोलकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून, दहा हजारांहून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलनाने राज्यभरातले व्यवहार रोखल्यानंतर आता सरकारने कठोर कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. या आंदोलनात हिंसक घटना घडलेल्या भागात आंदोलकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून, दहा हजारांहून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

ऑगस्ट क्रांतिदिनी राज्यात मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र ‘बंद’ केला होता. बहुतांश भागांत शांततेच्या मार्गाने आंदोलन झाले असले, तरी अनेक ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. त्यात औरंगाबाद, हिंगोली, पुणे, नाशिक, नागपूर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रशासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी यंत्रणेवर हल्ला करणे, ‘रास्ता रोको’ करताना सार्वजनिक मालमत्तेला बाधा पोचवणे, सरकारी कामांत अडथळा आणणे यासह मनुष्यवधाचा प्रयत्न करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे नोंदवलेल्या आंदोलकांच्या अटकेसाठी पोलिस यंत्रणा सरसावली असून, आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे, तर हजारो आंदोलकांना नोटीस बजावून पोलिसांपुढे हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. 

औरंगाबादमध्ये वाळूज उद्योग क्षेत्रात कंपन्यांचे मोठे नुकसान झाल्याने या भागातल्या आंदोलनकर्त्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. अनेक आंदोलक पोलिसांच्या रडारवर असून, सीसीटीव्ही फुटेज पाहून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या उद्योजकांना सरकारने संपूर्ण सहकार्य व सुरक्षा देण्याची ग्वाही दिली आहे. नुकसानाच्या पाहणीसाठी समिती पाठविण्याचा मानस सरकारने व्यक्‍त केल्याचे सांगण्यात येते.

मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात यावी. कंपन्यांमधील तोडफोड ही मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आहे.
- चंद्रकांत खैरे, खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation crime police