#MarathaKrantiMorcha चाकणमध्ये भडका

#MarathaKrantiMorcha चाकणमध्ये भडका

चाकण - राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (ता. ३०) पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढलेल्या मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर शेकडो युवकांच्या जमावाने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या एसटी व खासगी बस आणि पीएमपीच्या (शहर वाहतूक सेवा) सुमारे २५ बस आणि मालवाहू ट्रक, पोलिसांची वाहने, तसेच पोलिस चौकी जाळली. पोलिसांना सायंकाळी सहा वाजता जमावावर नियंत्रण आणण्यात यश आले. राजगुरुनगरमध्येही आंदोलना दरम्‍यान जाळपोळीचे प्रकार घडले. पुणे शहरात कोंढवा, कोथरूड, वाघोली येथे तर पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडी येथेही आज आंदोलने झाली. दरम्यान, गेल्या सात दिवसांपासून राज्यात आंदोलनाची धग कायम आहे. 

या आंदोलनामुळे नाशिक, नगर, कोल्हापूर, मुंबई या शहरांकडे जाणारी वाहतूक दुपारनंतर खंडित झाली होती.  या वेळी जमावाने शंभरहून अधिक वाहनांची तोडफोड करण्यात आली. या वेळी जमावाकडून दोन पोलिस अधिकारी व एका पोलिस कर्मचारी यांनाही मारहाण करण्यात आली. पोलिस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. या जमावाला आवरणे पोलिसांना अवघड झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. 

कोल्हापूर परिक्षेत्राचे विश्वास नांगरे पाटील, पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोठ्या फौजफाट्यासह तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. नांगरे पाटील व संदीप पाटील यांनी शहरात फिरून जमावाला शांततेचे आवाहन केले. त्यानंतर ही दंगल नियंत्रणात आली.

सोमवारी सकाळी साडेदहाला खेड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने चाकणमध्ये मोर्चा काढण्यात आला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास पुणे- नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते, माजी आमदार दिलीप मोहिते, आमदार सुरेश गोरे आदी उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन हिंसक करू नका, असे आवाहन करण्यात आले. आंदोलन शांततेत पूर्ण झाले. परंतु, आंदोलनानंतर सुमारे एक हजार तरुणांचा जमाव तळेगाव चौकात आला. या जमावाने एसटी, खासगी बस व इतर वाहनांची तोडफोड केली.

जमावातील तरुणांनी हातात तलवारी, काठ्या, लोखंडी गज घेऊन अक्षरक्षः धुमाकूळ घातला. रॉकेल, डिझेल, पेट्रोलच्या बाटल्या फेकून बस पेटवून दिल्या. स्थानिक पोलिस जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण जमाव शांत होत नव्हता. जमावाने उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची गाडी तसेच पोलिस व्हॅन पेटवून दिली. बसस्थानकासमोरील शासकीय वाहने आणि काही बस पेटवून दिल्यानंतर जमावाने दुपारी अडीचच्या सुमारास चाकण पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला. पोलिस ठाण्यावर दगडफेक करून खिडक्‍यांच्या काचा फोडल्या आणि ठाण्यासमोरील वाहने पेटवून दिली. यामुळे भयभीत झालेले पोलिस खोली बंद करून लपून बसले. नांगरे पाटील यांनी माणिक चौकातील

जमावासमोर जाऊन तेथील जमाव शांत केला. पुणे- नाशिक महामार्गावर जाऊन पाहणी केली. आमदार सुरेश गोरे यांच्याशी या प्रकाराबाबत चर्चा केली. 

फोटो काढणाऱ्यांना मारहाण
दरम्यान, सरकारी व खासगी कार्यालयांमधून सायंकाळी घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. या वेळी जाळपोळ आणि मोडतोड झालेल्या वाहनांचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या नागरिकांनाही संतप्त जमावाने बेदम मारहाण केली.  

दोन शिवशाही बसला  मार्ग करून दिला....
नाशिकहून आलेल्या दोन शिवशाही बसना जमावातील तरुणांनी मार्ग करून देत त्या दोन्ही बस स्थानकात आणल्या. त्यातील प्रवाशांचे मात्र हाल झाले. सहा ते सात तास प्रवासी ताटकळत राहिले.

राज्यभरात धग
मराठा आरक्षणासाठी औरंगाबादेत तिसरा बळी. 
मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही आंदोलने.
पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद; एसटी सेवा विस्कळित. 
पुणे शहरात 
वर्धा-गोंदियात धरणे आंदोलन. 
चिखलीत (जि. अकोला) तहसीलवर मूक मोर्चा. 
नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ‘रास्ता रोको’
कोल्हापूरमध्ये चौघांनी प्रतीकात्मक फाशी घेतली 
नाशिकमध्ये शिवसेना आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. 
नाशिक- पुणे शिवशाही बस बंद केल्या. 
सोलापूर जिल्ह्यात ‘बंद’ला हिंसक वळण.
एसटीचे तीन दिवसांत सहा कोटींचे नुकसान.

चाकण जाळपोळीचे "ते' आठ तास 
- स.10.30 - चाकण मार्केट यार्ड आवारातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून सकल मराठा समाजाचा मोर्चा सुरू; सुमारे 1000 कार्यकर्ते सहभागी. 
- 10.45 - मोर्चा शिवाजी मंदिरात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. 
- 11.05 - मोर्चाचे चाकण-शिक्रापूर रस्त्याने माणिक चौकात आगमन. 
- 11.15 - पुणे- नाशिक महामार्गाने मोर्चा तळेगाव चौकात थांबला आणि रस्ता रोको सुरू. दोन्ही बाजूची वाहतूक बंद. 
- 11.30 - मोर्चापुढे नेत्यांची भाषणे, सहभाग सुमारे 2000 जणांचा. 
- 11.45 - भाषणे संपली आणि मोर्चातील सर्व कार्यकर्ते आल्या मार्गाने परत गेले. 
- 11.55 - पुण्याच्या बाजूने सुमारे एक हजार तरुणांचे टोळके हातात भगवे, लाठ्या-काठ्या, तलवारी, पेट्रोल बाटल्या घेऊन तळेगाव चौकात. 
- दु. 12.00 - तळेगाव चौकात पहिली एसटी बस आणि मागे उभी असलेली पीएमपी बस फोडली. आग लावण्याचाही प्रयत्न. 
- 12.05 - तोच संतप्त जमाव घोषणा देत पुण्याच्या दिशेने. 
- 12.10 - महामार्गावर कानपिळे पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या चार एसटी बस, गुजरात सरकारची एक बस पेटवली. 
- 12.20 - त्याच जमावाने वागे वस्तीजवळील कोहिनूर सेंटर समोरील चार बस पेटविल्या. 
- 12.30 - नाशिकच्या दिशेने उभ्या असलेल्या दोन शिवशाही बस याच आंदोलकांनी चाकण स्थानकात आणून लावल्या 
- 1.00 - तळेगाव चौकात उभी असलेली पोलिसांची तीन वाहने जमावाने पेटवली. पोलिसांनी हवेत गोळीबार केला; परंतु संतप्त जमाव अंगावर चालून आल्याने पोलिसांनी धूम ठोकली. 
- 1.10 - चाकण बस स्थानकात उभी असलेली एक बस आणि महसूल खात्याची जीप जमावाने पेटवून दिली, जमाव पुन्हा तळेगाव चौकात 
- 2.30 - पोलिस ठाण्यावर जोरदार दगडफेक; चौकीच्या काचा फुटल्या. जीव वाचविण्यासाठी पोलिस चौकीतच लपून बसले 
- 3.00 - संतप्त जमाव एकतानगरच्या दिशेने सरकला आणि जाताना रस्त्यातील वाहनांची तोडफोड केली 
- 3.40 - पोलिसांची कुमक शहरात दाखल, विश्‍वास नांगरे पाटील यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जमाव पांगला 
- सा. 5 - तळेगाव चौक, माणिक चौकाची पोलिसांनी पाहणी केली, जळालेली वाहने बाजूला घेत रस्ता मोकळा केला 
- 6 - सर्वत्र शुकशुकाट. पोलिस बंदोबस्तात महामार्गावरील वाहतूक सुरळीत 

 

आमदार सत्तार यांचा राजीनामा 
औरंगाबाद -  मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामासत्र सुरूच असून, आज माजी मंत्री व सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला. राजीनामा देणारे सत्तार हे जिल्ह्यातील तिसरे आमदार आहेत. मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी नुकतेच आमदारकीचे राजीनामे दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com