Video:मुलींप्रमाणे जीव लावलेल्या सुनांनी सासुबाईंच्या पार्थिवाला दिला खांदा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

सूनांमधले वाद नवे नाहीत. घरापासून ते थेट पोलिस ठाणे आणि कोर्टाच्या पायरीपर्यंत हे वाद गेल्याचे प्रकार सवश्रुत आहेत. परंतु, सुनाही मुलीसारख्या आणि सासूही आई समान, असे नाते जपणाऱ्या नाईकवाडे कुटूंबातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे. सासुबाईंच्या पार्थिवाला सोमवारी (ता. नऊ) चारही सुनांनी खांदा दिला. यामुळे परंपरेला छेद आणि सासू-सुनांतील नात्याचा प्रत्यय समोर आला.

बीड : सूनांमधले वाद नवे नाहीत. घरापासून ते थेट पोलिस ठाणे आणि कोर्टाच्या पायरीपर्यंत हे वाद गेल्याचे प्रकार सवश्रुत आहेत. परंतु, सुनाही मुलीसारख्या आणि सासूही आई समान, असे नाते जपणाऱ्या नाईकवाडे कुटूंबातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे. सासुबाईंच्या पार्थिवाला सोमवारी (ता. नऊ) चारही सुनांनी खांदा दिला. यामुळे परंपरेला छेद आणि सासू-सुनांतील नात्याचा प्रत्यय समोर आला.

सुनांनीच घेतला निर्णय
शहरातील पांगरी रोडवर असलेल्या काशिनाथ गिरम नगरमधील सुंदरबाई दगडू नाईकवाडे (वय ८३) यांचं ८३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अध्यात्मिक वृत्तीच्या असलेल्या सुंदरबाई यांनी आयुष्यात केवळ देवधर्मासोबतच तत्व आणि मुल्यांचही पालन केलं. त्यांनी आपल्या चारही सुना लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे व मीना मच्छिंद्र नाईकवाडे यांना कायम मुलींप्रेमाणे प्रेम आणि माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही.

वृद्धापकाळाकडे झुकलेल्या सुंदरबाई यांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्याअगोदर हजर असे. त्यातही चौघींपैकी कधी कोणी ‘तू-मी’ असे केले नाही. त्यांच्यातले नाते म्हणजे सासू-सून नाही तर, आई-मुलीप्रेमाणेच फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकलेही. दरम्यान, गौरींचा (महालक्ष्मीणाचा) सण संपताच सोमवारी (ता. नऊ) सुंदराबाईंचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. सकाळी अंत्यविधी निघाली त्यावेळी परंपरेप्रमाणे मुले आणि जावई प्रेतला खांदा देण्यासाठी पुढे आले. परंतु, याच वेळी लताबाई नाईकवाडे, उषाबाई नाईकवाडे, मनीषा नाईकवाडे व मीनाबाई नाईकवाडे या चार सुनासमोर आल्या आणि ‘आमच्या आईला आम्ही खांदा देणार’ असं म्हणत चौघींनी पार्थिवाला खांदा दिला.

परंपरेला दिला छेद
दरम्यान, निधनानंतर पार्थिवाची अंत्ययात्रा निघाल्यानंतर आणि स्मशानभूमीत महिलांनी जाण्याची प्रथाही अनेक ठिकाणी नाही. त्यात या परंपरेला छेद देत लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे आणि मीना मच्छिंद्र नाईकवाडे यांनी थेट सासुबाईंच्या पार्थिवाला खांदा दिला. सासुबाईंनी आम्हाला सन्मानाने वागायला शिकवलं. त्यांनी कायम आम्हाला मुलीसमान वागणूक आणि प्रेम दिले. मूलं म्हणून आमचे पती खांदा देतील. पण, आमच्यावर तेवढंच प्रेम आहे म्हणून आम्ही चोघीदेखील खांदा देण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबीयांनीही संमती दाखवली, असे लता नाईकवाडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daughter in law took participation in Funeral of mother in law marathwada beed