जल बचत अभियानावर करणार साडेतीन लाख कोटी खर्च : मोदी 

विकास देशमुख
Saturday, 7 September 2019

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपच्या 'ऑरिक शेंद्रा' प्रकल्पाचे लोकार्पण 

औरंगाबाद  -  "पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावा लागणारा संघर्ष आणि येणाऱ्या अडचणीची मला जाणीव आहे. त्यांची अडचण सोडवण्यासाठी सरकारने जल जीवन अभियानाची सुरवात केली आहे. त्यासाठी सरकार येत्या काळात साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता. सात) म्हणाले. प्रत्येक घरात पाणी, एलपीजी सिलिंडर आणि स्वच्छतागृह पोचवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपच्या 'ऑरिक शेंद्रा' प्रकल्पाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी त्यांच्या उपस्थितीत "सक्षम महिला मेळावा'ही झाला. श्री. मोदी म्हणाले, "ऑरिक स्मार्ट सिटी तर बनणारच आहे. शिवाय हे शहर 'दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर'शी (डीएमआयसी) जोडलेले असून, देशातील औद्योगिक हालचालींचे केंद्र होईल. अनेक कंपन्या येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. काही आल्या आहेत. यातून येथील हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे.'' 
 
मराठवाड्याबद्दल काय म्हणाले मोदी? 
प्रस्तावित वॉटर ग्रीडचा मराठवाडा मोठा लाभार्थी असेल. मराठवाड्यात पहिला वॉटर ग्रीड प्रकल्प केला जात आहे, हे प्रशंसनीय काम आहे. हा प्रकल्प कार्यान्वित होईल, तेव्हा या भागात पाण्याची उपलब्धता वाढणार आहे. प्रत्येक गावापर्यंत पिण्यासाठी, तर शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी पोचवण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहे. 
 
बचत गटासंदर्भात काय म्हणाले मोदी? 

  • गावांची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी महिला आणि महिला बचत सर्वांची मदत खूप आवश्‍यक आहे. 
  • स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सशक्‍तीकरणाबरोबर कुटुंबाचीही आर्थिक स्थिती सुधारत आहे. 
  • कुटुंब सशक्‍त असेल, तर देशाची ताकद आपोआप वाढते. 
  • महिला उद्योग क्षेत्रात येत आहेत. याला अधिक गती देण्याची गरज असून, सरकारी स्तरावर योग्य ती पावले उचलली जातील. 

 
जन-धन संदर्भात काय म्हणाले मोदी? 
गरिबांना कोणत्याही खासगी सावकाराकडून पैसे घेण्याची आता गरज नाही. खात्यात पैसे नसले तरी जनधन खात्यावरून पाच हजार रुपये काढले जाऊ शकतील. ही जनधन खात्यावरची सोपी कर्जसुविधा असेल. 
 
मराठवाड्याला देणार 167 टीएमसी पाणी : मुख्यमंत्री 
कोकणातील पावसाचे समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी येत्या पाच वर्षांत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आणले जाणार आहे. शिवाय "ऑरिक'मुळे औद्योगिक क्षेत्रातील चुंबक म्हणून औरंगाबाद-जालन्याची ओळख निर्माण होणार असून, मराठवाड्याच्या इतिहासात आजचा दिवस हा औद्योगिक क्रांती दिन म्हणून ओळखला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi Announces Rs 3.5 Lakh Crore For Save water mission