मनमोहन सिंग बोलले तर मोदींचे कपडे फाटतील : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

 राहुल गांधींनी राफेलवर बोलू न बोलण्याचा सल्ला 

औरंगाबाद - "राज्याचा राजकारणात 370 व राफेलचा काय संबंध? कॉंग्रेसला राफेलवर बोलायचे असेल तर ते डॉ. मनमोहन सिंग यांनी बोलावे. राहुल गांधींनी बोलू नये. सिंग यांनी तोंड उघडले तर मोदींचे कपडे फाटतील'', अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आमखास मैदानावर सोमवारी (ता. 14) झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 
ऍड. आंबेडकर म्हणाले, "मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी आघाड्या उभ्या राहिल्या. त्यावेळी केवळ दगडाखालचा हात काढण्यापुरती साथ दिली गेली. त्यामुळे हे भांडण विचारांचे आहे हे लक्षात घ्या. चुकत असेल तर चूक म्हणायला शिका! इथल्या मुस्लिम नगरसेवकांनी विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला मते दिली. त्यामुळे राजकारणाची तसबीर साफ करण्याची वेळ आहे. धर्म प्यारा जरूर; मात्र घराबाहेर पडताना सामाजिक वंचित तत्त्वावर चला. ओवेसी चांगले आहेत; पण त्यांचे साथीदार चांगले नाहीत. त्यात डॉ गफ्फार कादरी यांचा अपवाद आहे'', असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या सहा महिन्यांत पाच नॅशनल बॅंका बुडतील, असे भाविकही वर्तवले. मध्यचे उमेदवार अमित भुईगळ, पश्‍चिमचे उमेदवार संदीप शिरसाट, पैठणचे विजय चव्हाण, फुलंब्रीचे जगन्नाथ रिठे, गंगापूरचे अंकुश कालवणे, कन्नडचे मारुती राठोड, सिल्लोडचे दादाराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. 
 
राज्यात पाण्याच नीट वापर नाही 
राज्यातील धरणातील पाणी नीट वापरल्या जात नाही. उकाई धरणात 103 टीएमसी पाणी आहे. ते पाणी 20 टक्के वापवरून सुरतमार्फत समुद्रात जाते ते जळगाव चाळीसगावहून इकडे का वळवत नाही, असा प्रश्‍नही आंबेडकर यांनी उपस्थित केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi should not speak on Rafael : Prakash Ambedkar

टॉपिकस