कोण होते महाराष्ट्रातील पहिले विरोधी पक्ष नेते? जाणून घ्या...

Who was the first opposition leader in Maharashtra assembly
Who was the first opposition leader in Maharashtra assembly

औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोचला. सत्ता मिळवण्यासाठी महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते डोअर टू डोअर जात आहेत. अशातच मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी सत्ता नको विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, अशी भूमिका घेतली. त्यामुळे लोकशाहीत सत्ताधारी पक्षाऐवढाच विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. त्या अनुषंगाने संयुक्त महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेतील पहिल्या विरोधी नेत्यांच्या कार्याचा eSakal.com ने घेतलेला धांडोळा.... 

कोण आहेत पहिले विरोधी पक्ष नेता? 
1 मे 1960 मराठी भाषिकांचे राज्य म्हणून संयुक्त महाराष्ट्र वेगळे राज्य झाले. पण, त्यावेळी विधानसभेची वेगळी निवडणूक झाली नाही. त्यापूर्वी झालेल्या 1957 च्या निवडणुकीत निवडून आलेले विधानसभा आणि विधान परिषद सदस्य या नवीन राज्यातील विधिमंडळात होते. स्वाभाविकच त्यावेळी कॉंग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने कॉंग्रेसचे यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र समितीचे (रिपब्लिकन पक्ष) अॅड. रामचंद्र ऊर्फ आर. डी. भंडारे हे विधानसभेतील तर विधान परिषदेत याच समितीचे कॉम्रेड माधवराव ऊर्फ एम. बी. गायकवाड यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाली. वर्ष 1962 च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत ते या पदावर होते. 
 
संयुक्त महाराष्ट्र समितीत यांचा समावेश  
मराठी भाषिकांच्या निर्मितीसाठी 3 फेब्रुवारी 1956 ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, दादासाहेब गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे, अण्णा डांगे, नाना पाटील, सेनापती बापट, ना. ग. गोरे, जयंतराव टिळक अशा नेत्यांसह एकूण 11 घटक पक्षांचा यात समावेश होता. यामध्ये कॉंग्रेसचा समावेश नव्हता. या समितीने वर्ष 1957 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यात बलाढ्य कॉंग्रेसच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत या समितीला 396 जागांपैकी तब्बल 155 जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती
प्रमुख विरोधी पक्ष बनली. 
 
विरोधी पक्ष नेता म्हणून अॅड. भंडारे यांचे कार्य 
मुंबईत जन्मलेले अॅड. रामचंद्र ऊर्फ आर. डी. भंडारे हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातील पहिले विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची ओळख आहे. विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी पानशेत धरण फुटीसंदर्भात विधान परिषदेत चर्चा घडवून आणली होती. हे धरण फुटल्याने पुण्यात खूप मोठे नुकसान झाले होते, हे धरण फुटलेच कसे, त्याला जबाबदार कोण आहेत, या बाबत प्रश्न विचारून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले होते. शिवाय अविश्वास प्रस्तावही आणला होता. 
 
विरोधी पक्ष नेता म्हणून कॉम्रेड गायकवाड यांचे कार्य 
कॉम्रेड माधवराव ऊर्फ एम. बी. गायकवाड यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान होते. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर विधान परिषदेतील पहिले विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शेती प्रश्नाचे ते अभ्यास होते. वर्ष 1960-62 या दोन वर्षांत विधान परिषदेची विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी शेतीप्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी केली होती. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे लढा उभारला. संघर्ष करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. वर्ष 1971 ते 81 या काळात ते मनमाडचे नगराध्यक्ष होते. 1985-90 पर्यंत ते विधानसभा सदस्य होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com