भारतात वाढतेय उच्च रक्तदाबाचे प्रमाण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यामुळे हृदयविकारात वाढ होऊ शकते

मुंबई : आधुनिक जीवनशैलीचा एक परिणाम असणाऱ्या वाढत्या ताणतणावामुळे भारतीयांमध्ये उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1 आणि 2) प्रमाण वाढीस लागल्याचे "इंडिया हार्ट स्टडी' अहवालातून समोर आले आहे. एरिस लाईफसायन्सेस या भारतीय औषधनिर्मिती कंपनीने केलेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 42 टक्के रुग्णांनी आपल्याला सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याचे सांगितले.

या कंपनीने सर्वेक्षण केलेल्या 15 राज्यांपैकी जम्मू-काश्‍मीरमध्ये अतिउच्च रक्तदाब म्हणजे प्रकार 2 रक्तदाबाच्या रुग्णांची टक्केवारी सर्वाधिक असल्याचे आढळले. हे प्रमाण जम्मू-काश्‍मीरमध्ये 27.7 टक्के, आणि त्याखालोखाल बिहारमध्ये 25.2 टक्के दिसून आले. महाराष्ट्रातील अतिउच्च रक्तदाबाचे प्रमाण 21.7 टक्के आहे. उच्च रक्तदाबाचे (प्रकार 1) सर्वांत जास्त म्हणजे तब्बल 42.5 टक्के रुग्ण राजस्थानात आढळले. हे प्रमाण केरळमध्ये 36.2 टक्के; तर जम्मू-काश्‍मीरमध्ये 19.1 टक्के असल्याचे या "इंडिया हार्ट स्टडी' अहवालात म्हटले आहे.

दररोज दिनक्रमाच्या सुरुवातीलाच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत असेल, तर घरातच बीपी ऍपरेटस्‌च्या मदतीने तपासणी सुरू करा, असा सल्ला हा अहवाल तयार करणारे मुख्य संशोधक व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र कौल आणि नेदरलॅंड्‌समधील मास्ट्रिच येथील कार्डिओव्हॅस्क्‍युलर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डॉ. विल्यम वेरबॅक यांनी दिला. उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यामुळे हृदयविकारात वाढ होऊ शकते, असे हिंदुजा रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. सी. के. पोंडे म्हणाले. उच्च रक्तदाब नियंत्रणाबाहेर गेल्यास मूत्रपिंडाच्या आजारांत वाढ होते, असे ग्लोबल रुग्णालयाचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. प्रशांत राजपूत यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात सर्वेक्षण 
रुग्णांची संख्या : 18,918 
डॉक्‍टरांची संख्या : 1233 
राज्ये : 15 

रक्तदाबाविषयी... 
सर्वसाधारण : 90 ते 119 मि.मी. 
पूर्व उच्च : 119 ते 139 मि.मी. 
उच्च (प्रकार 1) : 140 ते 159 मि.मी. 
उच्च (प्रकार 2) : 160 मि.मी.हून अधिक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The high blood pressure level in India is increasing