esakal | मोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

मोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे.

मोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. या रोखठोकच्या सदरातून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.,

काय आहे आजच्या रोखठोक सदरात 

  • देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरलं आहे. करोना, लॉकडाउनमुळे ओढवलेलं आर्थिक संकट आणि दुसरीकडे सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत राऊत यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “नवीन वर्षात कोणती फळे मिळतील त्याचा भरवसा नाही. लोकांनी एकच करावे, आपले कुटुंब कसे वाचवता येईल ते पाहावे. बाकी देश सांभाळायला मोदी व त्यांचे दोन-चार लोक आहेत.
  • मावळत्या वर्षात देशाने जे आघात सहन केले त्यांत कोरोनाचा हल्ला मोठा. लाखो लोकांनी प्राण गमावले. त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ‘संसद’ म्हणजे लोकशाहीचा आत्मा. तो आत्माच नष्ट झाला. शेतकऱ्य़ांचे आंदोलन ज्या तीन कृषी विधेयकांविरुद्ध सुरू आहे ती तीनही विधेयके बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतली गेली. आता त्या विधेयकांविरोधात शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अयोध्येच्या राममंदिरासारखे भावनिक विषय उभे केले जातात, पण शेतकऱ्य़ांच्या भावनेचा विचार सरकार करीत नाही. हिंदुस्थानात लोकशाही राजवट असल्याचे आपण मानतो, परंतु चार-पाच उद्योगपती, दोन – चार राजकारणी व्यक्ती आपल्या महत्त्वाकांक्षा, वैर, राग लोभ, अहंकार यांच्यासाठी देशाला कसे वेठीस धरतात याचे चित्र मावळत्या वर्षात दिसले. देशहिताचा विचार आता संपुचित ठरत आहे. पक्षहित व व्यक्तिपूजा म्हणजेच देशहित. राजकारणात फक्त स्वार्थ, कपटीपणा आणि शेवटी हिंसा इतकेच शिल्लक राहिले काय, असा प्रश्न पं. बंगालमधील सध्याचे वातावरण पाहून पडतो.
  • राज्यांतील सरकारे अस्थिर करण्यात पंतप्रधान विशेष रस घेत असतील, तर कसं व्हायचं? “मावळत्या वर्षाने महागाई, बेरोजगारी, आर्थिक डबघाई, निराशा, वैफल्याचे ओझे उगवत्या वर्षावर टाकले आहे. सरकारकडे पैसा नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी, सरकारे पाडण्या-बनवण्यासाठी पैसे आहेत. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. या स्थितीत आपल्या पंतप्रधानांना शांत झोप लागत असेल तर त्यांचे कौतुक करायला हवे. बिहारात निवडणूक झाल्या. तेथे तेजस्वी यादव यांनी मोदी यांच्याशी टक्करच घेतली. बिहारचे नितीशकुमार व भाजपाची सत्ता प्रामाणिक मार्गाने आली नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचेच नेते विजय वर्गीय यांनी केला. राज्यांची सरकारे अस्थिर करण्यात आपले पंतप्रधान विशेष रस घेत असतील तर कसे व्हायचे? पंतप्रधान देशाचे आहेत. संघराज्य बनून देश उभा आहे. ज्या राज्यांत भाजपाची सरकारे नाहीत ती राज्येही राष्ट्राशीच नाते सांगतात, हा विचार मारला जात आहे. 
  • चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर…करोना काळात देशात परकीय गुंतवणूक येत आहे. यातील बरीचशी गुंतवणूक ही सामंजस्य करारातच अडपून पडली. महाराष्ट्रात 25 कंपन्यांनी 61 हजार 42 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले. त्यातून अडीच लाख नवे रोजगार निर्माण होतील, पण त्याचवेळी पुण्याजवळ तळेगावचा जनरल मोटर्स कारखाना बंद पडत आहे व 1800 कामगारांच्या चुली विझताना दिसत आहेत. हिंदुस्थान-चीनमधील तणावातून निर्माण झालेले हे संकट आहे. चीनचे सैन्य 2020 मध्ये हिंदुस्थानच्या हद्दीत घुसले. त्यांनी आपली जमीन ताब्यात घेतली. चिनी सैनिकांना आपल्याला मागे ढकलता आले नाही, पण लोकांचे लक्ष या संकटावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादाची नवी काडी टाकली गेली. चिनी माल व चिनी गुंतवणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रचार झाला. चिनी कंपनी ग्रेट वॉल मोटर्स आर्थिक संकटात सापडलेल्या जनरल मोटर्स कंपनीत पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार होती. आता ते होणार नाही. त्यामुळे जनरल मोटर्स बंद होईल. चिनी गुंतवणूक रोखण्यापेक्षा चीनचे सैन्य मागे ढकलले असते तर राष्ट्रवाद प्रखर तेजाने उजळून निघाला असता. 

mouthpiece saamana shiv sena sanjay raut pm modi government

loading image