नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश

नॉन कोविड रुग्णसेवेकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे, आरोग्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. 

या वर्षात नागरिकांसह आरोग्य यंत्रणा कोरोनाशी यशस्वी लढा देत आहे. कोरोना नियंत्रणात असला तरी त्यासाठीचे नियम पाळणे आवश्यक आहे. नवीन वर्ष सर्वांना आरोग्यदायी आणि कोरोनामुक्त जावो अशा शुभेच्छा आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आढावा घेतला. 

मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आरोग्यमंत्र्यांनी ही बैठक घेत यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे काम चांगले झाले असून आता राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरु करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापनासाठी कार्यप्रणाली

आरोग्यचे राष्ट्रीय कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी संनियंत्रणाची प्रणाली विकसित करावी. जेणेकरुन प्रत्येक अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन करता येईल. यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी

दिव्यांगांना प्रमाणपत्र देताना त्याची प्रक्रिया अधिक सुलभ करावी. हे प्रमाणपत्र शक्य झाल्यास ग्रामीण रुग्णालय आणि उप जिल्हा रुग्णालय स्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सांगितले.

राज्यातील आरोग्य संस्थांचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यावर भर दिला जात असून जिल्हा यंत्रणेने सार्वजनिक आरोग्य संस्थेतील स्वच्छता, परिसर स्वच्छता, भोजनाचा दर्जा याकडे विशेष लक्ष देऊन सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा चेहरा बदलण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करणार

आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा मानस असून त्यासाठी तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यांचा तौलनिक अभ्यास करावा, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

pay attention non covid patient services Rajesh Tope order District Health Department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com