विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पडदा!

नेत्वा धुरी
Wednesday, 21 August 2019

ऊन, घाम आणि धुळीमुळे नेत्रविकारात वाढ; नेत्ररोगतज्ज्ञांची माहिती 

मुंबई : दुष्काळाने करपलेले रान पाहून पाणावलेल्या, पावसाची वाट पाहून थकलेल्या विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांना आता एका वेगळ्याच दुखण्याला सामोरे जावे लागत आहे. घाम आणि धूळ यामुळे डोळ्यांच्या बुब्बुळांवर पडदा निर्माण होण्याचा विकार या भागात वाढल्याचे दिसत आहे. उन्हातान्हात खपणारे शेतकरी आणि धूळभरल्या वाटांवरून प्रवास करणारे मोटारसायकल चालक यांच्यात हा विकार प्रामुख्याने दिसत आहे. 

नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या आठवड्यात बीडमध्ये घेतलेल्या नेत्रतपासणी शिबिरात त्यांना असे रुग्ण आढळून आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्रविकाराच्या सुमारे पाच टक्के रुग्णांमध्ये हा विकार दिसून आला आहे. मोटारसायकल चालकांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितली. 

विदर्भात या विकाराला डोळ्यांत मासोळी पडणे असे म्हणतात. काही ठिकाणी याला डोळ्यांत फूल पडणे असेही म्हटले जाते. नागपुरच्या सरकारी रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी सांगितले, की नेत्रचिकीत्सा विभागात दिवसाला 300 रुग्ण येतात. त्यापैकी 15 रुग्णांमध्ये ही समस्या दिसते. शेतकऱ्यांचा दिवसभर थेट उन्हाशी संपर्क येतो. त्यातच विदर्भात धुळीचे प्रमाणही जास्त असल्याने शेतकऱ्यांत हा विकार आढळतो. 

तिशीपासूनच त्रास 
हा विकार प्रामुख्याने 30 ते 50 वयोगटातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे. या वयोगटातील व्यक्तींचा खुल्या जागेत जास्त वावर असतो. त्यामुळे त्यांना ही व्याधी होत असल्याची शक्‍यता आहे. 
 
"बीडमधील शिबिरात सात हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी 350 जणांच्या बुबुळावर पडदा असल्याचे आढळले. या सर्वांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 
- डॉ. तात्याराव लहाने, प्रभारी संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचनालयालय 
.... 
बुबुळावर पडदा आल्याचे रुग्ण गेल्या काही वर्षांत अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. प्रामुख्याने औषधोपचाराने हा पडदा काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काहींवर शस्त्रक्रिया करावी लागते. दिवसाला 15 रुग्ण आढळले, तर त्यांपैकी पाच जणांवर शस्त्रक्रिया करावी लागते. 
- डॉ. अशोक मदान, विभागप्रमुख, नेत्रचिकित्सा विभाग, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The veil in the eyes of the farmers of Vidarbha, Marathwada