esakal | फितूर साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश 

बोलून बातमी शोधा

Court orders to file charges against witnesses who taken u turn}

एका बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात दोषी आरोपींना मदत करण्यासाठी फितूर झालेल्या बालकाशी संबंधित नात्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज येथील न्यायालयात दिले.

फितूर साक्षीदारांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश 
sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली) : एका बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात दोषी आरोपींना मदत करण्यासाठी फितूर झालेल्या बालकाशी संबंधित नात्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज येथील न्यायालयात दिले. त्यामध्ये त्या मुलाची आई व चुलत भाऊ यांचा समावेश आहे. या दोघांनी न्यायालयामध्ये खोटी साक्ष दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज देण्यात आले. 

गावातील घरात सोडतो असे सांगून दोघांनी एका मुलास मोटारसायकल वरून शेतात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या खटल्यात आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

पीडित मुलाच्या आईनेच पोलिसात फिर्याद दाखल केली होती आणि न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जबाब देखील दिला होता. नंतर मात्र आई व त्या मुलाचा चुलत भाऊ या दोघांनीही साक्ष फिरवली. त्यामुळे न्यायाधीश एस. सी. मूनघाटे यांनी त्या दोघांना "न्यायालयासमोर आधी खोटी साक्ष दिली, म्हणून आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये?', अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

सहायक सरकारी वकील अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले. याप्रकरणी 'साक्षीदार हे न्यायालयाचे कान व डोळे असतात. त्यांच्या मदतीशिवाय न्यायालय न्याय देण्याचे काम करू शकत नाही. न्याय होण्यासाठी साक्षीदाराने न्यायालयात खरे सांगणे अपेक्षित आहे', असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

साक्षीदार व फिर्यादी फितूर होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे, त्यामुळे न्यायदानात अडथळे निर्माण होत आहेत. आजच्या निर्णयामुळे अशा फितूर लोकांवर वचक बसेल, असा विश्वास वकिलांनी व्यक्त केला. 

संपादन : युवराज यादव