सोलापूरच्या मुंबईतील "या' प्रदर्शनाला देश-विदेशींनी दिली भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रायोजकत्वाने व सोलापुरातील गारमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने मुंबईतील गोरेगाव (पू.) येथील बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाला सहा हजार 870 खरेदीदारांनी भेट दिली. याआधी झालेल्या तीन प्रदर्शनांच्या तुलनेत या प्रदर्शनाला सर्वाधिक खरेदीदारांनी भेट दिली आहे.

सोलापूर : एजंटांच्या भरवशावर व त्यांनी ठरवलेल्या किमतीतच कुठल्याही वस्तूंचे उत्पादन घेणे व विक्री करणे, या आतबट्ट्याच्या व्यवहारात सोलापुरातील अनेक उद्योजक-व्यावसायिक नुकसानीत जाऊन उद्योग गुंडाळण्याच्या प्रयत्नात असताना, येथील सोलापूर गारमेंट असोसिएशनने सलग चार वर्षे आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म प्रदर्शन भरवून जगात सोलापूरचे नाव करत आहेत. अशाच प्रकारे येथील उद्योजकांनी मार्केटिंगसाठी बाहेर पडल्यास उद्योग गुंडाळण्याऐवजी उद्योगाचे विस्तारीकरण करू शकतील.

हेही वाचा : सोलापुरात झेडपीच्या राजकीय जुळवाजुळवीला वेग

सहा हजार 870 खरेदीदारांनी दिली भेट
राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या प्रायोजकत्वाने व सोलापुरातील गारमेंट असोसिएशनच्या पुढाकाराने मुंबईतील गोरेगाव (पू.) येथील बॉम्बे एक्‍झिबिशन सेंटर येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाला सहा हजार 870 खरेदीदारांनी भेट दिली. याआधी झालेल्या तीन प्रदर्शनांच्या तुलनेत या प्रदर्शनाला सर्वाधिक खरेदीदारांनी भेट दिली आहे. गणवेशासंबंधी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन हे मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात एकूण 142 स्टॉल होते. यात सोलापुरातील उत्पादकांचे 68 स्टॉल तर इतर ब्रॅंडेड कंपन्या, कापड मिल, आधुनिक मशिनरींच्या विविध कंपन्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील रेडिमेड गारमेंट उत्पादकांच्या स्टॉलचा समावेश होता.

हेही वाचा : चला पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे

23 राज्ये व नऊ देशांतील खरेदीदारांचा समावेश
या प्रदर्शनात सर्वच स्टॉलना खरेदीदारांचा उत्स्फूर्त मिळाल्याचे असोसिएटेड गारमेंट क्‍लस्टर फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र डाकलिया यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, देशातील 23 राज्यांतून तसेच सौदी, दुबई, नेपाळ, तिबेट, केनिया, युगांडा, युरोपियन देश, कतार आदी आठ ते नऊ देशांतील खरेदीदारांनी भेट दिली. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामुळे राज्यातील उत्पादकांची एकमेकांशी ओळख झाली. अनेक वर्षांपासून भेट न झालेले व्यापारी व उत्पादकांची पुनर्भेट घडून आली. एकमेकांच्या अनुभवांची देवाण-घेवाण झाली. या प्रदर्शनामुळे गारमेंट उत्पादकांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याची भावना सहभागी स्टॉलधारकांनी व्यक्त केली.

दरवर्षी वाढतेय प्रदर्शनाची व्याप्ती

  • पहिले प्रदर्शन 2016 (100 स्टॉल, 2,500 खरेदीदार)
  • दुसरे प्रदर्शन 2017 (125 स्टॉल, 3000 खरेदीदार)
  • तिसरे प्रदर्शन 2018 (130 स्टॉल, 4500 खरेदीदार)
  • चौथे प्रदर्शन 2019 (142 स्टॉल, 6870 खरेदीदार)

हेही वाचा : निवडणूक आहे, पण मतदारच नाहीत

आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले ब्रॅंडिंग, मार्केटिंग
राज्य वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने सोलापूर गारमेंट असोसिएशनने सलग चार वर्षे आंतरराष्ट्रीय प्रदर्शने भरवली. या चार प्रदर्शनांचे फलित असे की आम्ही जवळपास 17 ते 18 हजार देश-विदेशी खरेदीदारांशी कनेक्‍ट होऊ शकलो. सोलापूर युनिफॉर्मचे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रॅंडिंग व मार्केटिंग झाले आहे. भविष्यात या प्रदर्शनाचे फायदे दिसून येतील.
- जितेंद्र डाकलिया, अध्यक्ष, असोसिएटेड गारमेंट क्‍लस्टर फाउंडेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National international buyers visit to solapurs exhibition in Mumbai