उदयनराजे भाजपमध्ये; फायदा कोणाचा? तोटा कोणाचा?

उदयनराजे भाजपमध्ये; फायदा कोणाचा? तोटा कोणाचा?

पुणे : नाही. होय. नाही होय म्हणत, उदयनराजे भोसले यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापुरात करणार, मुंबईत करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत करणार, अशा चर्चांना तरी या प्रवेशामुळे पूर्णविराम मिळाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मध्यरात्री उठवून त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन, अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. एका अर्थानं उदयनराजे स्वगृही परतले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवण्यापासून १९९८मधील भाजप प्रवेश, पुढे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता पुन्हा भाजप असा उदयनराजे भोसले यांचा राजकीय प्रवास आहे. आता उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा नेमका कोणाला होणार? भाजपला की उदयनराजे भोसले यांना?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

भाजपला मिळाले ‘मराठा कार्ड’
उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्यामुळे मराठा आणि इतर समाजामध्ये त्यांची लोकप्रियता अफाट आहे. परिणामी भाजपमध्ये मिसिंग असलेले मराठा कार्ड उदयनराजे भोसले यांच्या रुपाने मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उदयनराजे यांच्या प्रवेशातून विधानसभा निवडणुकीत हेच अपेक्षित असावे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला आहे. पण, विधानसभा निवडणुकीत याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी एक मराठा कार्ड गरजेचे होते. ते उदयनराजेंच्या निमित्ताने भाजपने मिळवले आहे.

उदयनराजे राष्ट्रवादीत रमलेच नाहीत
उदयनराजे भोसले हे मुळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी रमलेच नाहीत. ‘मीच म्हणजे माझा पक्ष’, असं वक्तव्य एकदा उदयनराजे भोसले यांनी केले होते. राष्ट्रवादीतील नेत्यांशी त्यांचे सातत्याने खटके उडत होते. पण, सातारा लोकसभा मतदारसंघाची हक्काची जागा, म्हणून राष्ट्रवादीचे नेते उदयनराजे यांच्याकडं पाहत होते. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा होता. पण, साताऱ्यातील निकाल यामुळे बदलला नाही. त्यामुळे उदयनराजे पक्षात असणे, हे राष्ट्रवादीसाठी फायद्याचे आणि गरजेचे होते. पण, उदयनराजे यांनी केवळ आपला मतदारसंघ सांभाळण्याकडे विशेष लक्ष दिले. जिल्ह्यातील पक्षाच्या इतर नेत्यांशी त्यांचे जमलेच नाही. किंबहुना जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी पक्षवाढीसाठी उदयनराजे यांनी फारसे काही केले नाही. आता, राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा मतदारसंघात, तसाच विजय मिळेल, हे निश्चित सांगता येणार नाही. किंबहुना सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला तगडा उमेदवार शोधावा लागणार आहे.

तेव्हा शाहूंचे, आता शिवरायांचे वंशज
उत्तर प्रदेशात २०१७मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर भाजपने राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य केले होते. शाहूंचे वंशज या कार्डाचा लाभ भाजपने उठवण्याचा प्रयत्न केला. अर्थात याचा भाजपला कितपत फायदा झाला, हे पहावे लागेल. आज, संभाजीराजे छत्रपती थेट भाजपमध्ये दाखल झालेले नाहीत किंबहुना भाजप पक्षाच्या व्यासपीठावर ते फारसे दिसतही नाहीत. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज थेट भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याचा फायदा मात्र भाजपला होण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com