शाळा- महाविद्यालयांच्या 'या' लढ्याला लाभले यश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

शिक्षण क्षेत्रापुढील जुन्या व येऊ घातलेल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशाेकराव थाेरात यांनी नमूद केले.

मलकापूर ः शाळा- महाविद्यालयांना संच मान्यतेतून सूट देऊन मागील संच मान्यता गृहीत धरण्यात आली. त्यामुळे वीस वर्षांपासून सुरू असलेल्या शिक्षण संस्थांच्या लढ्याला यश मिळाले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात यांनी दिली.
 
थाेरात म्हणाले, महाराष्ट्रातील शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी, पालक व समाजाला वेठीस धरून शिक्षण नाकारणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरुद्ध सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ गेली वीस- बावीस वर्षे लढा देत आहेत.

एकजुटीने लढा उभारला

राज्यातील सर्व स्तरांवर अतिरिक्त शिक्षकांची एक कृत्रिम समस्या शासनाने निर्माण केली आहे. लेखनिक, शिपाई भरती बंद व शिक्षक भरतीचे शिक्षण संस्थांचे अधिकार काढून घेण्याविरुद्ध शिक्षण संस्थांनी एकजुटीने लढा दिला आहे. दर वर्षी संच मान्यतेच्या नावाखाली शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्था चालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू होते. सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, मुख्याध्यापक संघटना, शिक्षकांच्या संघटनांनी एकत्रित लढा देऊन यश मिळवले आहे.

मागील संच मान्यता गृहीत धरणार

या वर्षी शाळा- महाविद्यालयांना संच मान्यतेतून सूट देऊन मागील संच मान्यता गृहीत धरण्यात आली. याबाबत माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील व उपाध्यक्ष, अशोकराव थोरात, जिल्हा शिक्षण संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून हा निर्णय झाला आहे. शिक्षण क्षेत्रापुढील जुन्या व येऊ घातलेल्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, असेही श्री. थोरात यांनी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools - Colleges Successede In The Fight For Sanch Manyta