Loksabha 2019 : हा तर वंचित बहुजनांचा लोकलढा; आंबेडकर यांची संपूर्ण मुलाखत

Loksabha 2019 : हा तर वंचित बहुजनांचा लोकलढा; आंबेडकर यांची संपूर्ण मुलाखत

प्रश्न: वंचित बहुजन आघाडीच का? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सत्ताकाळात बहुजनांना वंचित ठेवले. सध्याचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारही हेच करीत आहे. त्यामुळे आजही वंचित राहिलेला बहुजन समाज आज जागरूक झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची ही लढाई आहे. वंचित बहुजन हा देशातील 40 टक्के मतदार आहे. तो काही भागांत एकवटला असेल हे मला मान्य आहे. पण जो वंचितांमधील समूह आहे. तो प्रत्येक सभेच्यानंतर आमच्याशी जे बोलत होता. वचनबद्धता सांगत होता. त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. 

प्रश्न: वंचित बहुजन आघाडी खरंच बहुजनांतील वंचितांचा विकास साधू शकेल? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: सोशल इंजिनीअरिंगचा हा पहिलाच प्रयोग नाही. यापूर्वीही भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून वंचित घटकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. त्याला काही फळं आली. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. या माध्यमातून आम्ही बहुजनांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. वंचितांमधील मोठा समूह हा कायम आर्थिकदृष्ट्या मागास ठेवण्यात आला. त्यांना बँकिंगच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले. कारण त्याच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीही नव्हते. अशा घटकांच्या विकासाचे कार्यक्रम आम्ही देऊ आता तर या घटकांच्या विकासाचे प्रयत्न सुरू केल्याशिवाय कोणात्याही सरकारपूढे पर्यायच राहणार नाही. वंचितांची दखल घ्यावीच लागेल. 

प्रश्न: निवडणुकीसाठीची आर्थिक ताकद कशी उभी करता? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: अर्थात लोकांकडूनच. आपण थोडं डोळसपणे बघितलं तर असे दिसेल की, बहुजन समाजाला कायम दाबण्याचा प्रयत्न झाला. मात्र, 1990 ते 1995 या काळातील राजकीय दबावामुळे अपरिहार्यतेतून काही सकारात्मक पावले उचलावी लागली. परिणामी बहुजन समाजातील काही घटक आर्थिकदृष्ट्या थोडा सावरला. पूर्वी आर्थिक ताकद नसल्याने गप्प राहावे लागत होते. आता ती वेळ नाही. यंदाच्या निवडणुकीपुरता विचार केला तरी वंचित बहुजनांमधून निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक किंवा प्रत्यक्ष सहभागाच्या रूपाने मदत होऊ लागली आहे. चंद्रपूरच्या मेळाव्यात तर सर्वसाधारण घरातील दोन महिलांनी त्यांची मंगळसूत्रे आम्हाला दिली. आम्ही या महिलांच्या भावनांचा आदर ठेवला. दोन्ही मंगळसूत्रे सांभाळून ठेवली आहेत. ही मंगळसूत्रे निवडणुकीनंतर आम्ही त्यांना परत करू. या महिला अतिशय साधारण घरातील आहेत. त्यांच्याकडे थोडी शेती आहे. काही दिवस शेतीत काम आणि काहीवेळा दुसऱ्याच्या शेतात शेतमजूरी असे करून त्यांचे कुटुंब चालते. ही घटना मोठी आहे. बहुजन समाजातील महिलेने प्रचारासाठी मंगळसूत्र काढून देणे ही आमच्यासाठी तरी क्रांतिकारी घटना आहे. अशा पद्धतीने हे काम चालते. आता आम्हाला प्रश्न विचारला जातोय की, पैसा कुठून उभा राहतो. यामागील गर्भितार्थ असा आहे की, आम्ही तुम्हाला गरीब ठेवलं होतं. आम्ही बघितलं की, तुम्ही गरीबच राहा. पण आता तुमच्याकडे ‘रिसोर्स’ आला कुठून. हा प्रश्न केला जात आहे. बहुजनांकडे ‘रिसोर्स’ आला कोठून हे या लोकांना बघत नाही, म्हणून असे प्रश्न विचारले जातात. 

प्रश्न: काँग्रेस-राष्ट्रवादी हे संघाचे हस्तक आहेत, असा आरोप आपण केला आहे? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादीचे भाजपसोबत साटेलोटे आहे. आता निवडणुकीत परस्परांना कितीही दात दाखवित असले तरी उद्या भाजपला सरकार स्थापनेस जागा कमी पडल्यास हेच पक्ष त्यांना मदत करतील. सध्या माझ्या मते ते विरोधात निवडणूक लढत नाही आहेत. केवळ लढण्याचे नाटक आहे. त्यांना जर खरोखर भाजपविरोधात लढायचे असते तर त्यांनी आम्हाला बाजुला ठेवलं नसतं. आम्हाला बाजुला ठेवणं जाणीवपूर्वक आहे. दरवेळेप्रमाणे इतर राजकीय पक्षांना ज्या प्रमाणे ते दाबतात अगदी तसेच यावेळी ते आम्हाला दाबतील. पण का दबावे. घटनात्मक अधिकारानुसार आम्ही वंचितांची लढाई सुरू केली आहे. 

प्रश्न: काही जागा देऊ केल्यात तरी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी का केली नाही? 

अॅड. प्रकाश आंबेडकर : आमचं जागांसाठी बेसिकली भांडण नाही. भांडण आहे ते मुळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेअंतर्गत आणण्याचं आहे. माझा आरोप आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीचं भाजपसोबत साटंलोटं आहे. येथे मुस्लिम, ख्रिश्चन, शेड्युल कास्ट आणि आदिवासी हा आपण नाही म्हटला तरी देशाचा 40 टक्के मतदार आहे. हा मतदार ‘आरएसएस’कडून त्रस्त आहे. आणि ‘आरएसएस’कडून त्रस्त असल्यामुळे आम्हाला प्रातिनिधीक स्वरूपात तरी सहभागी करून घ्या. हे ते मान्य करीत नाहीत. उलट पक्षात नसताना बाहेरून आयात करून यांनी सनातन्यांचे हस्तकांना उमेदवारी दिली. आम्हाला मात्र, दूर ठेवलं. आम्ही जिंकणाऱ्या जागा मागितल्याच नव्हत्या. गेल्या 70 वर्षांत माळी, धनगर लोकसभेत गेला नाही. त्यांना उमेदवारी द्या, ओबीसीतील लहान घटकांना, मुस्लिमांना द्या. कुठल्या जागा मागितल्या होत्या तर जेथे काँग्रेस सातत्याने हरत आली आहे. त्या जागा द्या. आम्ही जिंकलेल्या जागा मागितल्याच नव्हत्या. जेथे उमेदवार नाहीत त्या द्या, अशी मागणी करण्यात आली होती. पण त्यांनी नाकारल्याने आम्हाला 48 जागा लढणे अपरिहार्य ठरलं. आज असं दिसतेय की, या सर्व जागांवर आमचीच लढाई भाजप-शिवसेनेबरोबर आहे. 

प्रश्न: ‘एमआयएम’ला आपल्या घटक पक्षांकडून विरोध होतो आहे... 

अॅड. प्रकाश आंबेडकर: काही घटकांना चिंता आहे, हे मी मानतो परंतु यापूर्वीही मी जे प्रयोग केले त्यावेळीही मला मनोमन पाठिंबा देणारे घटक कधी सोबत आले कधी नाही. त्यामुळे सध्या लगेच चिंतेचे कारण नाही. डाव्या पक्षांनी मला पाठिंबा दिला त्याचे मी स्वागत करतो. परंतु हा बदल त्यांनी यापूर्वीच केला असता तर आज जे दिसते त्यात स्पष्टता आली असती. ज्या एनसीपीसोबत ते जा म्हणतात त्या एनसीपीला अटलबिहारी वाजपेयींच्या काळात राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यांना सत्ता जवळ हवी आहे. 

प्रश्न: वंचित आघाडीच्या राजकारणामुळे रिपब्लिकन चळवळ मागे पडली असे वाटते का? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा मुकनायक सुरू केले, नंतर बहिष्कृत सुरू केले, नंतर जनता अन् नंतर प्रबुद्ध भारत हे नियतकालीक सुरू केले. प्रत्येक फेजेसचे एरर संपल्यानंतर ते तेथे अडकून राहिले नाहीत. ते पुढे पुढे गेले. नावामध्ये त्यांनी चळवळ कधीच अडकविली नाही. तर त्यांनी नावाच्या माध्यमातून माझी चळवळ काय हे ते लोकांना सांगत गेले. आम्ही सुद्धा हेच करीत आहोत. बहुजनांची चळवळ झाली. त्यानंतर आता वंचितांची चळवळ आहे. वंचितांचे आम्ही ब्रिद वाक्य केले आहे की, आम्ही वंचित आहोत. यापुढे कुणाला वंचित राहू देणार नाही. जेव्हा आम्ही एक्स्लुसिव्ह राजकारण करीत नाही आहोत तर इन्क्लूसिव्ह राजकारण करीत आहोत. यात परंपरात असणारा सत्ताधारी वर्ग हा आमचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोधक आहे. आजपर्यंत त्यांनी याच परंपरेच्या नावाखाली आपली सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही असे मानतो की, या परंपरागत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी सत्ता त्यांनी त्या वर्गापुरती मर्यादित केली नाही तर त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित केली. त्यामुळे एक परंपरागत वर्चस्व मानणारा वर्ग हा सुद्धा कुटुंबशाहीमुळे वंचित राहिला. हा वर्ग ओपनली आमच्याकडे येणार नाही, मात्र, आतून तो आमच्या राहिल. कालांतराने हा वर्ग वंचितांसोबत येण्याची शक्यता आहे, असे मी या ठिकाणी मानतो. 

प्रश्न : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीशी पुन्हा बोलणार का? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: आम्ही विधानसभेलाही स्वतंत्रपणे लढणार आहोत. आता ते दरवाजे आम्ही बंद केले. आम्ही सर्वांना घेऊन पुढे जाण्याच्या विचारात होतो. परंतु, वर्चस्वाची मानसिकता जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली आहे आणि ती कुटुंबशाहीतून आली आहे. ती आता अशा थराला गेली आहे की, काय वक्तव्य करतो याचेही त्यांना भान राहिलेले नाही. साधं उदाहरण देतो. हेलिकॉप्टर आता लक्झरी राहिलेली नाही. पूर्वी कमी हेलिकॉप्टर होती ती, महागडी होती. आता अनेक कंपन्या आल्याने हेलिकॉप्टर स्वस्तात मिळतात. आम्ही एखादवेळी हेलिकॉप्टर वापरले तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांची अशी मानसिकता आहे की, अरे! यांनी हेलिकॉप्टर का वापरले. कुठून आले पैसे. ही जी शुद्र मानसिकता आहे. या शुद्र मानसिकतेबरोबर जावे असे आम्हाला आता वाटत नाही. 

प्रश्न: वंचित आघाडीचा प्रयोग इतर राज्यांत नेणार का? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: गेल्या आठ -दहा महिन्यांपासून आम्ही वंचित बहुजनांसाठी जी चवळवळ उभी केली. त्याचवेळी इतर राज्यातील लोकांकडून आम्हाला विचारणा झाली की, आम्ही आमच्या राज्यातून अशी चळवळ सुरू करतो. आम्ही त्यांनी सांगितले की, हरकत नाही. पण तुम्हाला राजकीय भूमिका घेता येणार नाही. कारण आम्ही आता जे करतोय त्यामधून एकदा यश येऊ द्या. आम्ही आमचा वेळ डिव्हाईड करू शकत नाही. एकदा येथे यश मिळाले की, मग उरलेल्या राज्यांत यश यायला वेळ लागणार नाही. आम्ही इतर राज्यांमध्ये संघटनात्मकपेक्षा व्यक्ती आयडेंटिफाईड केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हे काम पूढे जाईल. एकवेळ येथे यश मिळाले तर आपोआपच तो नॅशनल फिनॉमिना होईल. सध्या सर्वत्र माहोल तयार झाला आहे एवढेच मी म्हणेन... 

प्रश्न: लोकसभेमध्ये किती यशाची खात्री वाटते? 

अॅड. प्रकाश आंबेडकर: आता यशाची खात्री म्हणण्यापेक्षा मी मतदारांचे मत मांडेन. माळी, धनगर आणि वंजारी हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे वंचित बहुजन घटक आहेत. आज विचार केला तर वंजारी हे भाजपकडे आहेत. धनगर हा घटक बऱ्यापैकी आमच्याकडे आहे. माळ्यांचा जो प्रश्न आहे तो फेजेसमध्ये आहे. 30 ते 40 टक्के आमच्याकडे आहे. तो 60 टक्क्यांपर्यंत आमच्याकडे येईल. स्मॉलर ओबीसी सोनार, लोहार हा समाज आज 80 टक्क्यांपर्यंत आमच्याकडे आहे. सध्या आमच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत. पण आमचे उमेदवार रेसमध्ये आहेत. आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मुस्लिम. मुस्लिम समाजाचे आजचे मत हे भाजपला जो कुणी पराभूत करू त्यांच्याकडे जाणारे आहेत. आता मुस्लिम आमच्याकडे झुकु लागला आहे. एमआयएमचे तालुक्यातील सेंटर हे आमचे या समाजात शिरण्याचे केंद्र आहेत. उद्या, मुस्लिमांनी थेट आमच्याकडे आल्यास अनेक मतदारसंघांमधील रिझल्ट हे आमच्या बाजूने लागतील. चार जागा आम्हाला मिळाल्या तरी देशातील ही दुसऱ्या क्रमांकाची क्रांती ठरेल. हे एक मोठे सोशल ट्रान्स्फॉर्मेशन ठरेल आणि या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रक्रियेला कुणी थांबवू शकणार नाही. आम्ही जर जिंकलो तर राजकारणातील पैशाचा रोल पराभूत होईल. लोकशाही ही खऱ्या अर्थाने निर्माण होईल. लोकशाही ही धनदांडग्यांची नाही, जात दांडग्यांची नाही, धर्मदांडग्यांची नाही, घराणेशाहीची नाही तर खऱ्या अर्थाने लोकांची असेल. आम्हाला अपेक्षित यश मिळाल्यास भाजप, काँग्रेसलाही आपल्या धोरणांत बदल करावे लागतील. सामाजिक क्रांतीची सुरुवात होईल. त्याचा परिणाम वंचितांकडेही आर्थिक ताकद निर्माण होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com