अनियमित लोडशेडिंगमुळे 'इथल्या' नागरिकांचा संताप

रोशन खैरनार : सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अनियमित लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा आणि ऐन संध्याकाळी तासनतास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून वीजग्राहक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. 'ऑक्टोबर हीट' ची झळ पोहचत असताना इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. यामुळे शहर व परिसरात महावितरणच्या विरोधात तीव्र असंतोष वाढत आहे.

सटाणा  : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अनियमित लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा आणि ऐन संध्याकाळी तासनतास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून वीजग्राहक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. 'ऑक्टोबर हीट' ची झळ पोहचत असताना इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. यामुळे शहर व परिसरात महावितरणच्या विरोधात तीव्र असंतोष वाढत आहे. अनियमितपणे कधीही केले जाणारे लोडशेडिंग थांबले नाही तर नागरिकांच्या असंतोषाचे उद्रेकात रूपांतर होणार आहे. 

अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे ; नागरिकांच्या असंतोषाचे उद्रेकात रूपांतर होण्याची शक्यता
सध्या विधानसभा निवडणुकांबरोबरच सर्वत्र सहामाही परीक्षांचा काळ सुरू आहे. दिवसभरात किमान ५ ते ६ वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पुन्हा रात्री त्यापेक्षा जास्त वेळा वीज नसते. दिवाळी सणाला अवघे आठ दिवस शिल्लक असल्याने सणासुदीसाठी धावपळ सुरू असून मुलांच्या सहामाही परीक्षाही सुरू आहेत. त्यातच महावितरणने किरकोळ कामांसाठी अनियमित लोडशेडिंग सुरु केल्याने ऐन सायंकाळी मुलांना अंधारात अभ्यास करणे अशक्य झाले आहे. शहरातील सर्वच भागांत लोडशेडिंग व दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि परीक्षांच्या काळात विनाकारण तासनतास लोडशेडिंग सुरू झाल्याने नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतोय. 'ऑक्टोबर हीट' मुळे वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. वीज भारनियमन केल्याने पंख्याची हवा मिळणे कठीण झाल्याने लहान मुले, जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या भारनियमनाचा मोठा फटका विजेवर चालणार्‍या सर्वच व्यवसायांना बसत असल्याने वीज महावितरणच्या भोंगळ कारभाराला सर्वसामान्यांसह व्यापारीवर्गही त्रस्त झाला आहे. लोडशेडिंग किंवा महावितरणकडून तांत्रिक कामासाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनबाबत महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. कंपनीच्या कार्यालयात फोन केला असता, तोही उचलला जात नाही. याबाबत महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अरेरावीची भाषा वापरुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये, कोंम्प्युटर इन्स्टिट्यूट, हॉटेल, फोटो स्टुडिओ, दवाखाने अशा विजेवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना सध्या अनियमित लोडशेडिंगचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. शहरात लोडशेडिंग नसल्याचे वीज वितरण कंपनीतर्फे सांगितले जाते, मात्र दुरुस्तीचे कारण सांगून दिवसभर वीज गायब होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रतिक्रिया

सटाणा शहरात काही दिवसांपासून मनमानी पद्धतीने अनियमित वीज भारनियमन केले जात आहे. २४ तासात दिवसा व रात्री सात-आठ वेळा वीज खंडित होते. वीज मंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मात्र तक्रारींची दखल घेतली जात नाही. वीज बिलात मूळ वीज वापरापेक्षा १५० टक्क्यांचा इतर जास्तीचा कर भरुनही वीज भारनियमनामुळे नागरिक हैराण आहेत.- डॉ. सुधीर देवरे , नागरिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anger over the citizens due to irregular load shedding in satana