मॉन्सूनची व्याख्या बदलाची मागणी 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

काही वर्षांत सातत्याने पावसाचा कालावधी बदलतो आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)च्या व्याख्येनुसार मॉन्सून 1 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला सल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मॉन्सूनमध्ये मोजण्यासाठी मॉन्सूनची व्याख्या बदलण्याची मागणी होत आहे.

नाशिक :  काही वर्षांत सातत्याने पावसाचा कालावधी बदलतो आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)च्या व्याख्येनुसार मॉन्सून 1 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला सल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मॉन्सूनमध्ये मोजण्यासाठी मॉन्सूनची व्याख्या बदलण्याची मागणी होत आहे. 

पावसाचा हंगाम 15 नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने कालावधीत वाढ 
जून ते सप्टेंबर या अधिकृत मॉन्सून कालावधीत देशात सरासरीच्या 110 टक्के पाऊस पडला. 102 वर्षांपूर्वी म्हणजे 1917 मध्ये देशात सर्वाधिक म्हणजे 118 टक्के एवढा जास्त पाऊस झाला होता, असा दावा करीत, हवामानाचे अभ्यासक किरणकुमार जोहरे म्हणाले, की हवामान खात्याच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार 96 टक्के अधिक-उणे चार टक्के पाऊस पडेल, असा अंदाज होता. मात्र तो खोटा ठरवत प्रत्यक्षात पाऊस वर्तविलेल्या अंदाजाच्या दहा टक्के अधिक झाला आहे. यंदा 1994 नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे. यंदा देशभरातील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील अनुक्रमे 105, 115 आणि 152 टक्के पाऊस झाला. राज्यात 32 टक्के पाऊस अतिरिक्त पडला आहे. राज्यात यंदा गेल्या 30 वर्षांतील सर्वाधिक पाऊस आहे. महाराष्ट्रात 1901 पासून आतापर्यंतच्या 119 वर्षांत चौथ्या क्रमांकाचा पाऊस आहे. 
मराठवाड्यात एकूण पावसाचे दिवस 34 आहेत, याचाच अर्थ या 34 दिवसांत पडणारे पावसाचे पाणी मराठवाड्याला 365 दिवस जपून वापरावे लागते.

मराठवाड्यात दोन पावसांतील अंतर 50 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त असते, याचा फार मोठा फटका शेतीला बसतो. 98 टक्के कोरड्या शेतीत कापसासाठी दर वर्षी मराठवाड्यातील शेतकरी धोका पत्करतो. मुंबईत सरासरीच्या 35 टक्के, तर उपनगरात 66 टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. राज्यात पुण्यातील पाऊस सरासरीपेक्षा तब्बल 109 टक्के अधिक नोंदला गेला आहे. नागपूरला 27 टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. 

मॉन्सूनची आकडेवारी 
राज्यात जादा पाऊस 
वर्ष       टक्के 

१९८८   ३७.६ 
१९५९   ३७.१ 
१९८३   ३३.८ 

 "1 जून ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणारा पाऊस म्हणजे मॉन्सून,' अशी नवी व्याख्या हवामान खात्याने आता स्वीकारायला हवी. - किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The duration of the rainy season extends till November 15