आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उधाण

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 October 2019

उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ-ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उधाण आले आहे.

वणी : उत्साही गर्दीतून येणारा सप्तशृंगीचा जयघोष... त्यात विलीन झालेला घुंगराचा छनछनात व डफ- ताशांचा निनाद...अशा भक्तीमय वातावरणात शेकडो मैलांवरून अनवाणी आलेल्या कावडधारक व पदयात्रेकरूंची लाखो पावले गडावर दाखल झाली असून आदिमायेच्या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला उढाण आले आहे.

कावडधारकांची गर्दी; गडाचे रस्ते भगवेमय

कोजागरीच्या पूर्वसंध्येलाच सप्तशृंग गडावर येणारे सर्व मार्ग कावडधारकांच्या गर्दीने ओसंडून वाहत जावून भगवेमय झाले होते. आज (ता.१३) पहाटे चार वाजेपासून सप्तशृंग गडावर कावडधारक व पदयात्रेकरूंचे मोठ्या प्रमाणात आगमन होण्यास सुरवात होऊन दर्शनासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली होती. कावडधारक व यात्रेकरूंची गर्दी उत्तरोत्तर वाढत जाऊन भाविकांच्या पहिल्या पायरी पर्यंत दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. सकाळी साडेसातला देवीच्या अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान दुपारी १२ वाजेपासून भगवती मंदीरात व्ही आय पी दरवाजाने कावडीधारकांनी नाशिक जिल्ह्यासह पुणे, भीमाशंकर, नगर, शहादा, पिंपळनेर, असलोद, साक्री, दोंडाईचा तसेच मध्य प्रदेशातील खंडवा, इंदूर, उज्जैन, गुजरातमधील दमण, ओंकारेश्‍वर, वापी, सुरत आदी ठिकाणांहून गोदावरी, भीमा, मुळा, मुठा, चंद्रभागा, प्रवरा, तापी, नर्मदा, नार, क्षिप्रा तसेच अरबी समुद्राचे जल तसेच महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रानदीचे तीर्थ एकत्रित करून घेण्यात येत आहे.

भाविकांच्या दर्शनासाठी लागल्या बाऱ्या ; न्यासाने नियोजन

दुपारी भाविकांची एकच गर्दी उसळल्याने सप्तशृंगी देवी न्यासाच्या दवाखान्या पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या आहेत. यात महिला पदयात्रेकरु भाविकांची गर्दी लक्षणीय आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता नांदुरी त सप्तशृंगी गड या दरम्यान पाच ते मिनिटीस बस सोडण्यात येत आहे. मंदिरातही भाविकांची गर्दी लक्षात घेता न्यासाने नियोजन केल्याने एका मिनिटाला ५० ते ६० भाविक बाहेर पडत होते. न्यासाच्या महाप्रसादालयात मोफत व्यवस्था करण्यात आली होती. आज सुमारे ३० हजारांवर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कावडयात्रा व कोजागिरी उत्सवासाठी भाविकांची लावलेल्या समाधानकारक हजेरीमुळे व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. न्यासाच्या धर्मार्थ रुग्णालय व जिल्हा परीषदेच्या आरोग्य कक्षात  शेकडो भाविकांवर उपचार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kojagiri festival at vani saptashringi