Live Photo
Live Photo

#Vidhansabha 2019 युतीत नाराज असलो, तरी दुसरा पर्याय नाही : रामदास आठवले


नाशिक ः विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये दहा जागांची मागणी केली होती. त्यापैकी पाच जागा मिळाल्या असून सहाव्या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. त्यामुळे युतीमध्ये आपण नाराज आहोत. पण दुसरा पर्याय नाही, अशी व्यथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे मांडली. तसेच मानखुर्द-शिवाजीनगर जागेवरुन शिवसेनेने उमेदवार मागे घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी अधिक जागा मिळाल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री शक्‍य असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. 
भाजप-शिवसेना युतीला रिपब्लिकन पक्षाला वगळून निवडणूक अवघड असल्याचे स्पष्ट करत आठवले यांनी विधानसभा निवडणुकीत 240 ते 250 जागा जिंकेल असा दावा पत्रकारांशी बोलताना ठोकला. त्याचबरोबर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील, असाही दावा करत त्यांनी भाजप अधिक जागा लढवत असल्याची पुस्ती जोडली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 370 कलमाला विरोध होता. आतंकवाद वाढेल असे सांगणाऱ्या बाबासाहेबांचे ऐकले नाही म्हणून त्यांनी सभात्याग केल्याचे सांगून आठवले म्हणाले, की काश्‍मिर हा देशाचा अविभाज्य भाग झाला असून 15 ऑगस्टला तिरंगा फडकला व संविधान लागू झाले आहे. बाबासाहेबांची सगळी स्मारके पूर्ण केली जाणार आहेत. तसेच माझ्या केंद्रीय मंत्रालयाचे "बजेट' 81 हजार कोटींचे असून त्यातून गरीबांची कामे होतील. 2022 पर्यंत प्रत्येक घर मिळेल. 

सामाजिक परिवर्तनाचा दावा 
आठवलेंनी सामाजिक परिवर्तनाचा दावाही ठोकला. ते म्हणाले, की शिवशक्ती आणि भीमशक्तीने एकत्र यायला हवे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेटीवेळी मला सांगितले होते. त्यापूर्वी शिवसेना-भाजपवाले जयभीम म्हणत नव्हते. आमचे कार्यकर्तेही जय महाराष्ट्र म्हणत नव्हते. आता मात्र जयभीम म्हणत शिवसेना-भाजपवाले संवाद साधायला सुरवात करतात. 

सत्तेत कार्यकर्त्यांना मिळणार संधी 
कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सत्तेत वाटा देण्याचा शद्ब दिला आहे, असे सांगून ते म्हणाले, की एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद, तीन महामंडळांचे अध्यक्षपद, दोन विधानपरिषदेच्या जागा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्याचे मान्य करण्यात आले आहे. आमच्या पक्षाला कॉम्प्युटर चिन्ह मिळाले असले, तरीही कमी वेळेत जनेतपर्यंत पोचवण्यात असलेली अडचण लक्षात घेऊन कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कमळ चिन्हावर सहा जागांवर निवडणूक लढवत आहोत. माळशिरसमधून डॉ. विवेक गुजर, फलटणमधून दिगंबर आगाव, पाथरीमधून आमदार मोहन फड, नायगावमधून राजेश पवार, भंडारामधून अरविंद भालाधरे, मानखुर्द-शिवाजीनगरमधून गौतम सोनवणे हे आमचे उमेदवार आहेत. 
इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरच्या शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावीत, नाशिक मध्यमधील भाजप उमेदवार प्रा. देवयानी फरांदे, नांदगावचे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे, नाशिक पूर्वचे भाजपचे उमेदवार ऍड्‌. राहूल ढिकले, प्रकाश लांढे, प्रियकीर्ती त्रिभूवन आदी उपस्थित होते. 

रामदास आठवले म्हणालेत 
0 भाजपला बहुजनाचा चेहरा देणारे एकनाथ खडसेंना राज्यपालसारखे पद मिळण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी नाराजी काढून टाकावी 
0 भाजपने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी करणारे नाशिकमधील आमदार बाळासाहेब सानप "ऍक्‍टिव्ह' नेते आहेत. त्यांना विधानपरिषद मिळू शकते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा विचार सोडावा 
0 शिवसेनेने आमच्यावर अन्याय केला आहे. श्रीरामपूरची जागाही सोडली नाही. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमचे मित्र आहेत 
0 जंगल तोडण्यास आमचा विरोध पण विकासाला विरोध होऊ नये. आरे कॉलनीतील तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या तिप्पट झाडे लावावीत. पर्यारण मजबूत असावे 
0 शिवसेना-भाजपमध्ये नेहमी गडबड असते. आता दोघांमध्ये गडबड नाही. दोघांमध्ये समजूतदारपणा आहे 
0 मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ व्हावे, दलितांवरील अत्याचार थांबावेत, बाबासाहेबांचे स्मारक लवकर व्हावे, अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण पूर्ण भरावे अशा मागण्या 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com