esakal | #saathChal पावसाच्या सरींमुळे रिंगणाचा आनंद द्विगुणीत 
sakal

बोलून बातमी शोधा

#saathChal  पावसाच्या सरींमुळे रिंगणाचा आनंद द्विगुणीत 

वर्षभरातील ऊर्जा देणारा आनंदोत्सव म्हणजे वारी होय, त्यामुळे त्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील उळेगावच्या गणेश कुंभार यांनी व्यक्त केली. 

#saathChal पावसाच्या सरींमुळे रिंगणाचा आनंद द्विगुणीत 

sakal_logo
By
सचिन शिंदे

वाखरी -  पंढरी समीप आलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यावर वाडी कुरोलीसह बाजीराव विहीर परिसरात पाऊस बरसला. त्याच पावसात संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा चिंब भिजला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने वारकरी सुखावला तोंडले बोंडले परिसरात दरवर्षी पाऊस सोहळ्याला गाठतो. यंदा मात्र पाऊस पिराची कुरोली सोडल्यानंतर लागला. मात्र पावसामुळे वारकरी सुखावला होता. पावसात वारकरी चिंब भजिले होते. तशाच अवस्थेत सोहळा पुढे सरकत होता. वर्षभरातील ऊर्जा देणारा आनंदोत्सव म्हणजे वारी होय, त्यामुळे त्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे, अशी प्रतिक्रिया दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील उळेगावच्या गणेश कुंभार यांनी व्यक्त केली. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पिराची कुरोलीहून दुपारी बारा वाजता मार्गस्थ झाला. वाडी कुरोली येथे सोहळा पोचला त्या वेळी जमलेल्या ढगांनी सोहळ्यावर पावसाची बरसात केली. सुमारे पाऊण तास पाऊस झाला. जोराची सर आल्याने सोहळा चिंब भिजला. भिजलेल्या सोहळ्यातील अत्यंत देखणे उभे रिंगण बाजीरवार विहीर येथे अमाप उत्साहात पार पडले. 

वारकरी पावसाने सुखावला होता, भिजलेल्या कपड्यावर ते खेळ करत होते. काहीजण रेनकोट घालून चालत होते. उत्साहाच्या वातावरणात रिंगण सोहळ्याचा आनंद द्विगुणीत झाला होता. त्याच आनंदात तल्लीन झालेल्या दक्षिण सोलापूरच्या गणेश कुंभार याने लक्ष वेधले. भक्तीत तल्लीन झालेला गणेश पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो आहे. त्याची ही चौथी वारी आहे. तो रथापुढील दिंडी क्रमांक दोनमधून चालतो आहे. 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असूनही अभंगाचेही त्याचे चांगले पाठांतर आहे. घरी वारीचीही परंपरा आहे. गणेश म्हणाला, ""पंढरीच्या आत्मिक ओढीने सोहळा मार्गस्थ होतो आहे. वाखरीला तो विसावतोही. मात्र त्यापूर्वी झालेले उभे रिंगण अधिक शक्ती देणारे आहे. ती शक्ती जीवनातही आनंदी बनवते.'' 

वारी म्हणजे आनंदोत्सव असतो. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून वारीकडे पाहिले पाहिजे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना वारीतील मॅनेजमेंट नेहमीच उपयोगी पडते. 
- गणेश कुंभार, युवा वारकरी, उळे (जि. सोलापूर)