wari 2019 : अभंगाची सुरावट सांभाळतो जीवनाचा सूर

विलास काटे
Monday, 1 July 2019

‘‘पालखीबरोबर चालताना रोजच माउलींचा सहवास आणि दर्शन घडते. दिंडीत चालताना रोज अभंग म्हणतो. अभंगाची सुरावट जीवनाचा ताल, सूर सांभाळण्याचे काम करते. जीवन घडविण्यासाठी अध्यात्म मदत करते; म्हणून वारीत चालण्याचा मोह दरवर्षी होतो,’’ असे सतरा वर्षीय कार्तिक एखंडे सांगत होता.

जेजुरी -‘‘पालखीबरोबर चालताना रोजच माउलींचा सहवास आणि दर्शन घडते. दिंडीत चालताना रोज अभंग म्हणतो. अभंगाची सुरावट जीवनाचा ताल, सूर सांभाळण्याचे काम करते. जीवन घडविण्यासाठी अध्यात्म मदत करते; म्हणून वारीत चालण्याचा मोह दरवर्षी होतो,’’ असे सतरा वर्षीय कार्तिक एखंडे सांगत होता.

मूळचा जालना जिल्ह्यातील, मात्र सध्या आळंदीत आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या कार्तिकला पंढरीच्या वारीत चालण्याचा आनंद अधिक असतो. कार्तिकचे यंदाचे चौथे वर्ष आहे. वारीतून नेमके काय मिळते, याबाबत तो म्हणाला, की केवळ आनंद आणि आनंदच. आज तर संतांबरोबर कुलदैवतांचे दर्शन घडल्याने दुहेरी योग साधून आला.

सासवडमधून पालखी निघाली, तेव्हा नागरिकांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. अवघी वैष्णवांची मांदियाळी अंगावर पावसाच्या सरी झेलत चालत होती. जेजुरीतील दर्शनाने, स्वागताने मन आनंदून गेले.

सुकलवाडीत दुपारी समाजआरती
सासवड-जेजुरी वाटचालीत आज दिवसभर रिमझिम पाऊस होता. दुपारी जरा मोठा पाऊस झाला. वारकऱ्यांना रेनकोटचा आसरा घ्यावा लागला. पालखीतळावर मुक्कामाची उत्तम सोय होती. दरम्यान, माउलींची पालखी उद्या (ता. १) वाल्ह्याच्या सुकलवाडीत जाणार आहे. वाटचालीत एकमेव दुपारी असणारी समाजआरती होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kartik Ekhande expressed the experience of wari