wari 2019 : वारीच्या परंपरेतून जगण्याची दिशा 

wari 2019 : वारीच्या परंपरेतून जगण्याची दिशा 

निमगाव केतकी -  "पुंडलिका वरदे हरी विठ्ठल'चा गरज होताच वायुवेगाने अश्व धावले आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा ढगाळ, तर कधी उन्हामुळे निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणात बेलवडी (ता. इंदापूर) येथे पार पडला.

""देहूपासून चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी गोल रिंगण सोहळा म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे. वारीच्या परंपरेतून जगण्याची दिशा अगदी स्पष्ट कळते. वारीतील आनंद रोजच्या जीवनात कसा आणता येईल, असा प्रयत्न रोजच्या जगण्यातून करण्यासाठी प्रयत्न करीत आहे,'' अशी प्रतिक्रिया कायंदा मुसळे या युवा वारकरी मुलीने दिली. तिची पहिली वारी आहे. 

सणसरचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरला आज पहाटेच मार्गस्थ झाला. सकाळी सातच्या सुमारास पालखी सोहळा बेलवडी येथे पोचला. साडेसातला पालखी रिंगणात आली. त्यापूर्वी पखवाज, झेंडेकरी, टाळ-मृदंग, डोक्‍यावर तुळस घेतलेल्या महिला रिंगणात आल्या होत्या. दिंड्यांतील वारकऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिक मैदानाच्या सभोवताली बसले होते. काही वेळाने अश्व व त्यामागोमाग पालखी रिंगणात येताच "पुंडलिका वरदे...'चा जयघोष झाला. टाळ्यांच्या गजरात पालखीचे स्वागत झाले. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा रंगला. पावणेआठच्या सुमारास प्रत्यक्षात अश्व रिंगणात धावले. पहिल्यांदा महाराजांचे, नंतर चोपदारांचे अश्व रिंगणात एकामागोमाग धावले. त्या वेळी जयघोषाने परिसर दणाणून गेला. अश्वाने पाच वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर रिंगण सोहळा पार पडला. रिंगणात वारकऱ्यांनी खेळ केले. त्यात कायंदा मुसळे टाळ वाजवीत होती. तिची ही पहिलीच वारी आहे. ती आत्यंतिक आनंदाने खेळत होती. विठ्ठलनामाच्या गरजातही दंग होती. कायंदा रथामागील 25 क्रमांकाच्या दिंडीतून चालते. तिच्या नजरेतून रिंगण सोहळा म्हणजे "भाग गेला शिण गेला अवघा झालेसे आनंद' असाच होता. ती म्हणाली, की पालखीच्या वाटेवरील रिंगण सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी देहूपासून वाट पाहत होते. रिंगण सोहळ्यातील आनंद काय असतो, याची अनुभूती चालून आल्यानंतर जाणवली. आनंदी राहून प्रत्येक प्रसंगावर मात करण्याची शिकवण पालखीतून मिळते. ती प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणायची आहे. 

पालखी व रिंगण सोहळा आत्यंतिक आनंद देणारे प्रसंग आहेत. वारीतील वातावरण म्हणजेच एक आनंदी सोहळा असतो. त्यात संयमापासून प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याची शिकवण मिळते. ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे. 
कायंदा मुसळे, युवा वारकरी, मुसळेवाडी-बीड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com