wari 2019 : रिंगणाचा अनुभव सर्वांगसुंदर 

सचिन शिंदे  
शनिवार, 6 जुलै 2019

रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वीच पावसाने मैदानासह शेतकऱ्यांना झोडपून काढले. भरपावसात रिंगण होणार असे वातावरण असतानाच ऊन पडले. कधी ऊन, पाऊस, तर कधी ढग, अशा निर्सगाच्या खेळातच इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरा रिंगण सोहळा पार पडला.

इंदापूर -  रिंगण सोहळा सुरू होण्यापूर्वीच पावसाने मैदानासह शेतकऱ्यांना झोडपून काढले. भरपावसात रिंगण होणार असे वातावरण असतानाच ऊन पडले. कधी ऊन, पाऊस, तर कधी ढग, अशा निर्सगाच्या खेळातच इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरा रिंगण सोहळा पार पडला. ""इतका आनंद आणि उत्साह कोठेच पाहिला नाही. पहिल्यांदाच रिंगणाचा अनुभव घेतला, तो सर्वांगसुंदर होता. याच पद्धतीने आयुष्य जगले पाहिजे, याची शिकवण मिळाली,'' अवघ्या विशीतील नीलिमा काकडे सांगत होती. 

इंदापूरमध्ये सकाळी पावणेदहाच्या सुमारास पहिला पाऊस झाला, त्या वेळी पालखी सोहळा तरंगवाडी कॅनॉलजवळ होता. कदम विद्यालयात रिंगणासाठी गर्दी जमली होती. त्याचवेळी पुन्हा पावसाचा तडाखा बसला. या वेळी दोन मोठ्या सरी आल्या. पावसातच आता रिंगण होणार अशी स्थिती असतानाच ऊन पडू लागले. अवघ्या अर्ध्या तासात मैदान उन्हाने सुकले. अशा वातावरणातच विठ्ठलाचा गजर करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दुसरा रिंगण सोहळा पार पडला. 

वायुवेगाने धावलेल्या अश्वाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तो आनंद व्यक्त करताना वारकरी नाचत होते. नाचणाऱ्या वारकऱ्यांमध्ये नीलिमा टाळ वाजवत होती. तिची ही दुसरी वारी; मात्र रिंगणाचा पहिलाच अनुभव होता. नीलिमा म्हणाली, की आनंदाचे डोही आनंद तरंग असे वारीतील वातावरण आहे. तो आनंदाचा प्रत्येक क्षण आयुष्यातही प्रत्यक्षात यावा, याची शिकवणही वारीत मिळते. 

वारीत प्रत्येकजण एकमेकांचा आदर करतो. त्यांची शिकवण अत्यंत चांगली आहे. एकमेकांच्या आदरासह प्रत्येकाने आपुलकी जपली पाहिजे, हे वारीतून शिकले, ते प्रत्यक्ष जगण्यात आणायचे आहे. 
- नीलिमा काकडे, युवा वारकरी, वडगाव काकडे, जि. पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neelima kakade says Ringan experience beautiful