wari 2019 :  वैशिष्ट्यपूर्ण स्वागत अन्‌ रिंगणाने आनंद

सचिन शिंदे  
Thursday, 4 July 2019

 काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अन्‌ मेंढ्यांच्या रिंगणाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत झाले.

सणसर -  काटेवाडीत धोतराच्या पायघड्या अन्‌ मेंढ्यांच्या रिंगणाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत झाले. ढगाळ वातावरणाने सोहळ्याची वाटचाल सोपी होत गेली. बारामतीहून पालखी सोहळा सकाळी सणसरला मार्गस्थ झाला. काटेवाडीत पालखी सोहळ्याचे शाही स्वागत झाले. या स्वागताने वारकरी आनंदला आहे. ‘‘पालखी सोहळ्यात लोक सहभागी होतात, ते पाहूनही आनंदी आनंद होतो,’’ अशी प्रतिक्रिया देहूचा राहुल चौधरी याने व्यक्त केली.

बारामतीचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पहाटेच मार्गस्थ झाला. आजची वाटचाल छोटी होती. वाटेत काटेवाडीतील शाही स्वागत, धोतराच्या पायघड्या आणि मेंढ्यांचे रिंगण याचे औत्सुक्‍य वारकऱ्यांत दिसत होते. दुपारी बाराच्या सुमारास पालखी सोहळा काटेवाडी फाट्यावर पोचला. तेथे रथातील पालखी काढून गावकऱ्यांनी खांद्यावर घेतली. गावात परीट समाजाने धोतराच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत केले.

विसाव्यानंतर दुपारी तीनला सोहळा पुन्हा मार्गस्थ झाला. काटेवाडीच्या बस स्थानकावर पालखीरथ थांबला होता. तेथे मेंढ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा झाला. शेकडो मेंढ्यांनी रथाला पाच वेळा प्रदक्षिणा घातल्या. ‘‘मेंढ्यांच्या रिंगण सोहळा आज प्रत्यक्ष पाहता आले. धोतराच्या पायघड्यांनी स्वागताची परंपरा वेगळी आहे. या सगळ्यात सन्मान द्यायचा अन्‌ तो परत मिळवायचा, हा गुण घेण्यासारखा आहे,’’ अशी भावना राहुलने व्यक्त केली.

पालखी सोहळा म्हणजे आनंदी वातावरणाचा सोहळा. त्या सोहळ्यातील अनेक गुण रोजच्या जीवनात सहज वापरात येण्यासारखे आहेत. त्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज आहे. त्यातील चांगल्या गोष्टी नव्या पिढीने घ्याव्यात.
- राहुल चौधरी, युवा वरकरी, देहू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Chaudhary expressed his reaction