#SaathChal स्वच्छतेतही विठ्ठल पाहावा!

सचिन शिंदे
Sunday, 7 July 2019

मनातील अविचारांचा नाश व्हावा, आत्मिक समाधान मिळावे, यासाठी पालखी सोहळ्यात लोक सहभागी होतात. त्यांच्या भक्तिमार्गात स्वच्छता आल्यास नक्कीच वारी यापेक्षाही अाल्हाददायक व भक्तिमय वातावरणात निघू शकेल. वारीतील दिंड्यांनी त्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व 
जाणून घ्यावे. 
- स्वाती गांगुर्डे, युवा वारकरी,  चांदवड, नाशिक

सराटी - इंदापूरचा मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज सराटीच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुरवड ओलांडून सोहळा बावड्यात पोचला. त्याच वेळी जोरात पावसाची सर आली. किमान अर्धा तास झालेल्या पावसाने सोहळ्याला चिंब भिजवले.

पावसाबरोबरच स्वाती गांगुर्डे पखवाज वाजविण्याचाही आनंद घेत होती. ती म्हणाली, ‘‘दिंड्यांनी स्वच्छतेबाबत जबाबदारी घ्यायला हवी. त्यासाठी प्रत्येक दिंडीत स्वच्छतेसाठी चौघांवर जबाबदार द्यावी, दिंड्या स्वच्छतेत जागृत राहिल्यास वारी अधिक आरोग्यादायी होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’’ 

इंदापुरातून बाहेर पडलेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पहिल्या विसाव्यानंतर सुरवडमधून पुढे सरकत असतानाच पावसाचे वातावरण तयार झाले होते. बावड्यात नगारा पोचताच सुमारे अर्धा तास पाऊस झाला.

त्यामुळे सोहळा चिंब भिजला होता. बावडा भागात झालेला हा पहिलाच पाऊस होता. त्यामुळे ‘पालखी पाऊस घेऊन आली,’ अशा स्थानिकांची प्रतिक्रिया होती. पावसातच दिंड्या भजन आणि मृदंगाच्या तालात पुढे सरकत होत्या. आळंदीच्या दिंडीत स्वाती गांगुर्डे पखवाज वाजवत भिजत चालत होती. दुपारच्या मुक्कामाला थांबल्यानंतर तिच्याशी संवाद साधला. ती नाशिक जिल्ह्यातील चांदवडची राहणारी असून, तिची पाचवी वारी आहे. ती प्रवचनही देते. तिने वारीचा अभ्यास केला आहे. 

स्वाती म्हणाली, ‘‘वारी म्हणजे आनंदी सोहळा आहे. वारीत प्रत्येक दिडींने स्वच्छतेचे महत्त्व जाणले पाहिजे. आनंदी होताना स्वच्छता राखल्यास तो आनंद आरोग्यदायी असणार आहे, याची जगृती दिंड्यातून व्हायला हवी. 
दिंड्यांनी भक्ती मार्गावर स्वच्छतेतही विठ्ठल पाहावा, अशी अपेक्षा आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SaathChal Cleaning Sant Tukaram Maharaj Palkhi Soahala Aashadhi Wari