esakal | wari 2019 : लोणंदनगरीत माउलींचा गजर...! 
sakal

बोलून बातमी शोधा

wari 2019 : लोणंदनगरीत माउलींचा गजर...! 

wari 2019 : लोणंदनगरीत माउलींचा गजर...! 

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद - श्री संत ज्ञानेश्‍वर महराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात अगमन झाले. त्या वेळी जिल्ह्याच्या वतीने पालखी सोहळ्याचे पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्या वेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 

निरेत येथे (ता. पुरंदर) दुपारच्या विसावा आटोपून पालखी सोहळा दुपारी एक वाजता लोणंदकडे येण्यासाठी निघाला. निरा नदीच्या जुन्या पुलावरून पालखी रथ निरा नदीच्या अलीकडच्या तिरावर येताच माउलींच्या पादुका आळंदीपासूनच्या वाटचालीत प्रथमच पालखी रथातून बाहेर काढण्यात आल्या. पालखी सोहळाप्रमुख योगेश देसाई व पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, तसेच अन्य प्रमुख विश्‍वस्त व पुजारी यांच्या हस्ते नीरा नदीतील दत्त घाटावर नेऊन तेथे माउलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आले. यावर्षी सातारा पोलिस दलाच्या वतीने जुन्या पुलापासून दत्त घाटापर्यंत लोखंडी रेलिंग व स्नानाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवल्याने हा सोहळा गडबड, गोंधळ न होता शिस्तीत पार पडला. नदीच्या दोन्ही पुलांवर व दोन्ही तिरावर उभे राहून लाखो वारकरी व भाविकांनी डोळे भरून हा नयनरम्य सोहळा पाहिला. त्या वेळी भगव्या पतका उंच फडकावत, टाळ मृदंगाच्या गजरात माउली... माउली असा अखंड जयघोषही करण्यात आला. पालखी सोहळ्याचे आगमन होताच खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वरके, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, विषय समित्यांचे सभापती, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, खंडाळ्याचे सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील, पाडेगावचे सरपंच हरिश्‍चंद्र माने आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 

सकाळी 11 वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने अल्हादायी वातावरण होते. टाळ मृदंगाच्या गजरात मुखी हरिनामाचा जयघोष करत पालखी सोहळा मजल दरमजल करत लोणंदमध्ये पोचला. तत्पूर्वी पाडेगाव व बाळूपाटलाची वाडी येथेही ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत झाले. लोणंद नगरपंचायतीच्या पटांगणावर नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, उपाध्यक्ष किरण पवार, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सर्व नगरसेवक व नागरिकांनी पुष्पहार अर्पण स्वागत केले. पालखी सोहळा तानाजी चौकात येताच ग्रामस्थांनी माउलींची पालखी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरमार्गे नाचवत पालखी तळावर नेली, तर पालखी रथ जुन्या पेठेतून पालखी तळावर आणण्यात आला. त्या वेळी तेथे समाज आरती झाली. माउलींच्या आगमनाने लोणंदनगरीत उत्साह आहे. सर्वत्र वारकऱ्यांना अन्नदान व अन्य सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याची यंत्रणाची लगबग सुरू होती. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक सुहास गरूड, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांच्याकडे बंदोबस्ताची सूत्रे होती. दिंडीदरम्यान पाडेगावातील समता आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल-लेझीम पथकाने वाद्याच्या गजरात, तसेच शिवाजी विद्यापीठाच्या एनएसएसच्या एक हजार विद्यार्थांनी पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ करण्यासाठी सहकार्य केले. 

माउलींची पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता पालखी तळावर पोचला. त्या वेळी समाज आरती सुरू होण्यापूर्वीच पालखी सोहळा विश्‍वस्थांच्या वतीने लोणंद नगरपंचायत व प्रशासनाच्या सर्वच यंत्रणांनी वारकरी व भाविकांना पुरवण्यात आलेल्या सोयी-सुविधांबाबत समाधान व्यक्त करून ध्वनिक्षेपकावरून लोणंद नगरपंचायत व प्रशासनाचे अभिनंदन केले. चौपदरी रस्ता असतानाही अपघात होत आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान दोन दिवसांपूर्वी अशी घटना घडली आहे. त्यासाठी वारकरी व भाविकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालवे, असे आवाहनही करण्यात आले. 

चांदोबाचा लिंबला आज उभे रिंगण 
श्री संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखी सोहळा उद्या (ता. 3) दुपारी एक वाजता तरडगाव येथे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे. तत्पर्वी लोणंद-फलटण रस्त्यावर चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण होणार आहे.