wari 2019 : आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सवच 

सचिन शिंदे
शुक्रवार, 12 जुलै 2019

पंढरपूर म्हणजे संतांचे माहेर, आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सव. त्याची अनुभूती पंढरपुरात पोचल्यावर आली, अशी प्रतिक्रिया पंढरपूर तालुक्‍यातील वर्षा नागने यांनी दिली.

पंढरपूर - पंढरपूर म्हणजे संतांचे माहेर, आषाढी एकादशी म्हणजे आनंदोत्सव. त्याची अनुभूती पंढरपुरात पोचल्यावर आली, अशी प्रतिक्रिया पंढरपूर तालुक्‍यातील वर्षा नागने यांनी दिली. त्या रथापुढील क्रमांक तीनच्या गोरेडेश्वर काकाच्या दिंडीतून चालतात. त्यांची दुसरी वारी आहे. उद्या (शुक्रवारी) आषाढी एकादशी आहे. मात्र, अनेक भाविक आजपासूनच पंढरीत दाखल झाले आहेत. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वाखरीतून दुपारी एकच्या सुमारास पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणात पालखी सोहळा हळूहळू मार्गस्थ होत होता. पावसाचा शिडकावा अंगावर पडत होता, तर कधी ऊन येत होते. मात्र, वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने तितक्‍याच गतीने पडत होती. पंढरपूरच्या वेशीवर पादुका अभंग झाला. तेथेच अख्खा सोहळा जागेवरच थांबला. वारकरी रस्त्याच्या दुतर्फा एकमेकांकडे तोंड करून थांबले. चोपदारांनी उभे रिंगण लावले. वायूच्या वेगात उभ्या रिंगणात अश्व धावले आणि त्याचवेळी "ज्ञानोबा माउली'चा जयघोष झाला. रिंगणातच महिलांनी खेळ केले. त्यात वर्षा नागने व त्यांचा ग्रुप टाळ खेळात मग्न होता. त्यातील वर्षा यांच्याशी संवाद साधला. त्यांची दुसरी वारी आहे. पंढरपूर तालुक्‍यातून त्या देहूपर्यंत येतात. तेथून रथापुढील गोरेडेश्वर काका यांच्या दिंडी क्रमांक तीनमधून चालतात. त्या टाळ चांगला वाजवितात. अभंगाचे पाठांतरही चांगले आहे. 

संतभार पंढरीत दाखल होत असल्याने आत्मिक समाधान होत असल्याचे मत वर्षा यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, आषाढी एकादशीसाठी वारकरी आतुर असतो. देहूपासून आम्ही चालतो आहोत. ती विलक्षण ओढ आता आषाढी एकादशी दिवशी आत्मिक आनंदोत्सवात रूपांतरित होते आहे. पंढरपूर म्हणजे संतांचे माहेर आहे. तेथे प्रत्येक संतांचा चरणस्पर्श झाला आहे. त्या भूमीत आपण येतो आहोत. त्याचे समाधान आयुष्यातील चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. वर्षा नागने यांनी आत्मिक ओढीने सांगितलेली गोष्ट त्यांच्या चेहऱ्यावर सहजपणे जाणवत होती. शेकडो भाविक ज्या उत्कट भावनेने सावळ्या विठुरायाच्या दर्शनास आले होते; ती ओढ उद्या (शुक्रवारी) आषाढी एकादशीच्या दिवशी आनंदोत्सवात पारवर्तित होताना दिसणार होती. 

संतांच्या विचारानुसार समाज घडला पाहिजे. मात्र, तसे होण्याचे प्रमाण कमी आहे. प्रत्येकाने आषाढी एकदशीला संत आचरणाचा निश्‍चय केल्यास आनंदोत्सवात वाढच होईल. 
- वर्षा नागने, पंढरपूर तालुका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari 2019 Ashadhi Ekadashi means happiness