Wari 2019 : पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...

विलास काटे
शुक्रवार, 12 जुलै 2019

पादुका दर्शनासाठी गर्दी
माउलींचा पालखी सोहळा दुपारी वाखरी येथून निघाला. पुढे आल्यावर भाटे यांच्या रथात पालखी ठेवण्यात आली. वडार समाजाच्या भाविकांनी माउलींचा रथ ओढत इसबावीजवळ आणला. तेथे सोहळ्यातील उभे रिंगण चोपदारांनी लावले. येथे परंपरेप्रमाणे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी पादुका ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या. त्यांच्या डाव्या बाजूला राजाभाऊ आरफळकर, तर उजव्या बाजूला नानामहाराज वासकर होते. तिघांनी नाथ चौकातील माउली मंदिरात पादुका आणल्या. या वेळी पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या युवा वारकऱ्याने.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर हरिदास पंढरीच्या भूमीत पोचला, तेव्हा त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आज माझी अवस्था द्विधा झाली आहे. वारी संपल्याचे दुःख होत आहे. कारण वारी ही सुखाची, आनंदाची गंगा आहे. गेले अठरा दिवस वारीत चालताना मिळालेल्या सुखाचा पट समोर येत आहे. हा आनंददायी प्रवास संपूच नये असे वाटते. दुसरीकडे ज्याला पृथ्वीतलावरील वैकुंठ म्हणतात, अशा पंढरीत पोचल्याचा आनंदही कमी नाही.

वारीच्या वाटचालीत प्रत्येक सुखाच्या क्षणी विठ्ठल भेटला, तर मग आपण कशाच्या ओढीने इथपर्यंत आलो, हे उमगत नाही. वारी हा सुखाचा प्रवाह आहे आणि पंढरी त्या भक्तिप्रवाहाचा अनोखा संगम आहे. जीवन कष्टमय असले तरी त्याला भक्तीची साथ असेल तर ते कष्ट सुखात परावर्तित होतात, याची अनुभूती वारीत आली. पंढरपूर हे सकल तीर्थांचे माहेर आहे, असे वर्णन संतांनी अभंगांतून केले आहे, ते आज येथे पाऊल टाकले तेव्हा सत्यात उतरलेले दिसले.

श्रीविठ्ठलाची वारी त्यांच्या चरणी समर्पित करणे आणि काही न मागणे म्हणजेच वारीची खरी साधना आहे. पुढची वारी कधी येईल, असे आताच वाटते. ही सुखाची भावना म्हणजे वारी होय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Palkhi Sohala Aashadhi Wari Sant Dnyaneshwar Maharaj