मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

naxal File photo

मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी (ता. १३) पहाटेपासून पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात जवळपास 26 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काँबॅट ऑपरेशनसंदर्भात सविस्तर माहिती दिली. यामध्ये 26 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचं त्यांनी सांगितलं. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नक्षलवाद्यांचे मोठे नेते ठार झाल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत नक्षलविरोधी पोलीस पथकाचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरात हलवण्यात आले आहे. पोलिसांची मागील तीन वर्षातील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवीत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. या चकमकीत 26पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चकमकीत चार पोलिस जवान जखमी झाल्याचे कळते. या चकमकीबाबत प्रचंड गोपणीयता बाळगली जात आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी बाहेर आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरूनच सहा नक्षलवादी ठार झाल्याचे बोलले जात आहे. आज झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची अद्याप नेमकी ओळख पटलेली नाही. पण, यामध्ये संघटनेचा मोठा नेता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच आहे.

घटनास्थळी अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच असून, मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सी-६० कमांडोची टीम नक्षलविरोधी कोटगूल परिसरातील मरभिनटोला गावाजवळच्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना तिथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत केलेल्या गोळीबारात २६ नक्षलवाद्यांना कंठस्सान घातले. यात चार पोलिस जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सी-६० दलाच्या १५ ते १६ टीम या जंगल परिसरात असून अद्याप कारवाई सुरूच आहे.

आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

विशेष म्हणजे या चकमकीत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ श्रेणीतील चार मोठे नक्षल नेते ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात मिलिंद तेलतुंबडे व विजय रेड्डी, जोगन्ना तसेच संदीप दीपकराव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. यातील मिलिंद तेलतुंबडे व जोगन्ना हे नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत. मात्र, वृत्त लिहिपर्यंत पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कसनासूरनंतरची मोठी घटना

यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये भामरागड तालुक्यातील कसनासूर, बोरिया तसेच अहेरी तालुक्यातील राजारा (खांदला) या ठिकाणी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ४० हून अधिक नक्षलवादी ठार झाले होते. त्यामुळे शनिवारची ही ताजी चकमक कसनासूरनंतरची सर्वांत मोठी चकमक मानली जाते. मागील काही वर्षांपासून पोलिसांनी सर्वच बाबतीत आघाडी घेत नक्षलवाद्यांना पळता भुई थोडी केली होती. नक्षल चळवळीतील मोठे नेते मारले गेले, काहींनी शरणागती पत्करली.

याशिवाय या चळवळीपासून जनताही दुरावली असून, आता नक्षलवाद्यांना पूर्वीप्रमाणे नवीन भरती मिळत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळ पुरती थंडावली होती. त्यातच आता पोलिसांनी कोटगुल जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासह मोठ्या नक्षल नेत्यांनाही ठार केल्याने या चळवळीच्या चिंधड्या उडाल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांनी ही कारवाई केली आहे.

loading image
go to top