
‘मिशन वायू’तंर्गत 10 दिवसांत इतक्या कोटींची उपकरणे उपलब्ध
पुणे- ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘मिशन वायू’तंर्गत उद्योगांनी पुढाकार घेऊन तब्बल १०० कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणे शासकीय आणि खासगी रुग्णालयांना अवघ्या दहा दिवसांत उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा फायदा लाखो रुग्णांना होत आहे. त्यातील सुमारे ३५ कोटींचा निधी राज्यातील उद्योगांनी उभारला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये या उपकरणांचे वितरण सध्या सुरू आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) समन्वयातून निर्माण झालेल्या ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’ (पीपीसीआर) यासाठी राज्यात पुढाकार घेतला आहे. राज्याबाहेर त्यांना एसीटी ग्रॅंटस आणि स्वास्थ अलायन्स या संघटनांनी मदत केली. त्यातून ‘मिशन वायू’ हा उपक्रम सुरू झाली आहे. देशातील एक हजारपेक्षा जास्त उद्योग कंपन्या, उद्योजक आणि नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने निधीसाठी मदत केली. त्यातून अवघ्या १० दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांची उपकरणे देशात उपलब्ध झाली आहेत. देशातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता पीपीसीआरने सिंगापूरमधील टेमासेक फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यांनी ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सवलतीमध्ये उपलब्ध करून दिले तर, तर एअर इंडियाने वाहतुकीसाठी मदत केली. तसेच ॲमेझॉन इंडियाने या उपकरणांची देशातील वाहतूक मोफत केली. ओलम इंटरनॅशनल, केरी लॉजिस्टिक्स यांनीही मिशन वायूला मदत केली.
हेही वाचा: पुणे : "कोरोनाच्या हाहाकारात स्मार्ट सिटी कंपनी काय करतेय?"
मिशन वायूतंर्गत कोरोनाचा संसर्ग वाढलेल्या सहा प्रमुख राज्यांवर लक्ष केंद्रीत केले. त्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांपर्यंत संबंधित जिल्हाधिकऱ्यांमार्फत वैद्यकीय उपकरणे पोचविण्यात आली. ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणेला मर्यादा आहेत, त्या ठिकाणी उद्योगांनी पुढाकार घेतला. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय, सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालय यांनीही मिशन वायूसाठी सहकार्य केले.
मिशन वायूतंर्गत उपलब्ध केलेली उपकरणे
- ७८०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर
- ८७५ बायपॅक व्हेंटिलेटर
- ५० हजार ऑक्सिमीटर
सुधीर मेहता (अध्यक्ष - एमसीसीआयए आणि मुख्य समन्वयक - पीपीसीआर) ः कोरोनाची स्थिती गंभीर आहे म्हणून चिंताक्रांत होण्यापेक्षा काही तरी पावले उचलली पाहिजेत, या भूमिकेतून पीपीसीआरच्या माध्यमातून ‘मिशन वायू’ सुरू करण्यात आला. पुण्यातील उद्योगांनी तसेच राज्यातील आणि बाहेरील उद्योग समूहांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे अल्पावधीत १०० कोटींची वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करता आली.
Web Title: 100 Crore Equipment Available In 10 Days Under Mission Vayu Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..