राज्यातील 119 कारखान्यांना विजेचा आधार

तात्या लांडगे
सोमवार, 9 जुलै 2018

सोलापूर - मागील वर्षात राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी साखरेसह विजेची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली. बाजारात साखरेचे दर दिवसेंदिवस घसरत असल्याने चिंतेत असलेल्या कारखानदारांना विजेतून मिळणाऱ्या रकमेमुळे आधार मिळाला आहे. कारखान्यांनी तयार केलेल्या विजेपोटी त्यांना महावितरणकडून दोन हजार 28 कोटी रुपये टप्प्याटप्प्यात दिले जात आहेत. जुलैपर्यंत संपूर्ण रक्‍कम दिली जाईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

मागील हंगामात राज्यातील 150 साखर कारखान्यांनी नऊ लाख हेक्‍टरवरील उसाचे गाळप केले. त्यातून तब्बल 160 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. उत्पादन खर्च आणि बाजारातील साखेरचे दर याचे अर्थकारण विस्कटल्याने बहुतांशी साखर सध्या कारखान्यांकडे शिल्लकच आहे. मात्र, साखरेबरोबरच कारखान्यांनी केलेल्या अन्य उत्पादनामुळे साखर कारखान्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत.

कारखान्यांनी तयार केलेल्या विजेला महावितरणकडून प्रतियुनिट सरासरी पाच ते सहा रुपयांचा दर दिला जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना एफआरपीची रक्‍कम मिळण्याची आशा आहे. पेट्रोल पंपावर इथेनॉलच्या थेट विक्रीला परवानगी द्यावी, अशी अपेक्षा कारखानदारांनी "सकाळ'च्या माध्यमातून सरकारकडे व्यक्‍त केली आहे.

महावितरणकडून काही कारखान्यांना प्रतियुनिट 6.44 रुपये; तर काहींना 4.95 रुपये दर दिला जातो. आता सौरऊर्जेच्या उपलब्धतेमुळे कारखान्यांकडील वीज कमी दराने खरेदी होते; परंतु कारखान्यांसमोरील अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या पुढाकारातून महावितरणकडून प्रतियुनिट साडेसहा रुपयांचा दर अपेक्षित आहे.
- उमेश परिचारक, युटोपियन शुगर, पंढरपूर

आकडे बोलतात...
साखर कारखाने - 119
तयार केलेली वीज - 338 कोटी युनिट
मिळणारी रक्‍कम - 2,028 कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 119 sugar factory electricity