
१२ सिमकार्ड बदलणारा कारागीर मेरठमधून जेरबंद! महिला ‘PSI’ची धडाकेबाज कामगिरी
सोलापूर : शहरातील सराफ व्यावसायिकांचा विश्वास संपादित करून पाऊण किलो सोने घेऊन पसार झालेले तीन कारागीर शहर पोलिसांनी जेरबंद केले. मेरठमध्ये (उत्तरप्रदेश) सहा दिवस मुक्कमी राहिलेल्या पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे यांनी मुख्य संशयित आरोपी सर्फराज काझी याला पकडून सोलापुरात आणले. विशेष म्हणजे तो मोबाईल वापरत नव्हता. तत्पूर्वी, सहा महिन्यांत त्याने १२ सिमकार्ड बदलले होते.
मूळचे पश्चिम बंगाल येथील दागिन्यांचे कारागीर सर्फराज काझी हा त्याच्या दोन भावांसह सोलापुरात आला होता. चार-पाच वर्षांपासून तो सोलापुरात स्थायिक होता. या काळात त्याने सराफ दुकानदारांचा विश्वास संपादन केला होता. मे २०२३ मध्ये त्यांनी चार-पाच सराफांचे पाऊण किलो दागिने घेतले आणि रातोरात सोलापुरातून पलायन केले. जोडभावी पेठ पोलिसांत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. सुरवातीला पोलिसांना सर्फराज हाच एकमेव आरोपी असल्याचा संशय होता. पण, त्याच्या जोडीला त्याचा भाऊ ऐजाज व चूलत भाऊ अझरूद्दीन हेदेखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जोडभावी पेठ पोलिसांच्या डीबी पथकातील गणेश क्षीरसागर व जमादार लिगाडे यांनी ऐजाज व अझरुद्दीन काझी या दोघांना कर्नाटकातील हुबळी व माकणी येथून अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे यांनी सहकारी मल्लिनाथ स्वामी यांच्यासोबत विमानाने दिल्लीमार्गे मेरठ गाठली. कलकत्ता मार्केटमध्ये लपून लपून राहणाऱ्या सर्फराजवर त्यांनी सहा दिवस पाळत ठेवली. सहाव्या दिवशी अखेर त्याचा पाठलाग करून पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे यांनी त्याला पकडलेच. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. दिपाली काळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही कामगिरी पार पाडली.
न्यायाधीशांनी ‘लेडी सिघंम’चे केले कौतूक
पोलिस उपनिरीक्षक संजिवनी व्हट्टे यांनी सर्फराज काझी याला मेरठमधील कलकत्ता मार्केटमधून पकडले. त्यानंतर त्याला सोलापुरात आणण्यापूर्वी तेथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी महाराष्ट्रातून शेकडो किलोमीटर दूर येऊन एका महिला पोलिस अधिकाऱ्याने आरोपीला पकडल्याचे कौतूक स्वत: न्यायाधीशांनी केले. संशयित आरोपीचा सुगावा लागताच व्हट्टे यांनी एका सहकाऱ्यासमवेत विमानाने दिल्लीमार्गे मेरठ गाठले होते. सहा दिवस त्याठिकाणी राहून त्यांनी सर्फराजला पकडण्यात यश मिळवले.
मोबाईल वापरत नव्हता, ६ महिन्यांपासून होता फरार
सोलापुरातील सराफांची फसवणूक करून पसार झालेल्या सर्फराजने सहा महिन्यांत १२ सिमकार्ड बदलली. शहर गुन्हे शाखा, जोडभावी पेठ पोलिस, डीबी पथक त्याच्या मागावर होते. पण, तो सापडत नव्हता. तो मोबाइल वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. पण, तो मेरठमध्ये असल्याची खबर मिळताच पोलिस उपनिरीक्षक व्हट्टे यांनी कलकत्ता मार्केट गाठले आणि त्याला पकडून सोलापुरात आणले.