Shiv Sena : आणखी 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात! उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant

Shiv Sena : आणखी 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात! उदय सामंतांच्या दाव्याने खळबळ

मुंबईः इकडे उद्धव ठाकरेंनी मध्यावधीचं भाकित केलं असलं तरी दुसरीकडे शिवसेनेचे (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी मात्र १५ ते २० आमदार संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे.

उदय सामंत यांच्या म्हणण्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये याबाबत चित्र स्पष्ट होईल. कार्यकर्ते सैरभैर होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे मध्यावधीची भाषा करीत असल्याचं सामंतांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे शिवसेनेचे हक्क मिळाले आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार मागच्या अनेक महिन्यांपासून रखडलेला आहे. शिंदे गटातल्या अनेक आमदारांनी याबाबत जाहीर नाराजी बोलून दाखवली. तरीही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही.

शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं नेहमी बोललं जातं. तोच धागा धरुन दोन महिन्यांपूर्वी संजय राऊतांनी हे सरकार फेब्रुवारी महिन्यात कोसळेल, असं विधान केलं होतं. परंतु तशी काही चिन्हं दिसत नाही.

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. यावर मंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्टीकरण दिलं आहे.

उदय सामंत म्हणाले की, निवडणुकांची अजिबात शक्यता नाही. आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. कार्यकर्ते सैरभैर होऊ नयेत आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे नैराश्य येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे मध्यावधीची भाषा करीत असल्याचं सामंत म्हणाले.

'आणखी १५ ते २० आमदार आमच्या संपर्कात आहेत. येत्या दोन दिवसांत ते कळेलच.' असं विधान उदय सामंत यांनी केल्याने राज्यात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.