Ethanol Project : राज्यात १६३ इथेनॉल प्रकल्प सुरू

राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी आपले लक्ष इथेनॉल निर्मिती प्रकल्पांकडे वळविले आहे.
Ethanol Project
Ethanol Projectsakal

पुणे - राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांनी आपले लक्ष इथेनॉल निर्मिती प्रकल्पांकडे वळविले आहे. साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल उत्पादनांवर अधिक भर देत आहेत. आजघडीला राज्यात १६३ इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत.

सर्व प्रकल्पांतून मिळून दरवर्षी सुमारे २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होत आहे. यामुळे राज्यातील साखर उद्योगाची आता इंधन निर्मिती कारखान्यांकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वृत्ताला साखर आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पादनाच्या तुलनेत गेल्या वर्षी इथेनॉलच्या उत्पादनात १८ कोटी लिटरने वाढ झाली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात २२६ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. हेच उत्पादन गेल्या वर्षी (२०२२-२०२३) २४४ कोटी लिटर झाले आहे. चालू आर्थिक वर्षातही इथेनॉल उत्पादनाची सरासरी गेल्या वर्षीप्रमाणेच कायम राहिली आहे.

यंदाच्या ऊस गळीत हंगामात सर्व साखर कारखान्यांनी मिळून एकूण १६ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वर्ग केली आहे. यामुळेच यंदा इथेनॉलचे विक्रमी उत्पादन झाले आहे. पूर्वी साखर कारखान्यांमध्ये केवळ साखरेचेच उत्पादन होत होते. आता वीज, आसवनी (डिस्टिलरी), इथेनॉल, बायोगॅस आदींसह सुमारे ३५ उपपदार्थांची निर्मिती करणे शक्य झाल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

सोयाबीननंतर ऊस राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक झाले आहे. कारखान्यांचे रँकिंग केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानंतर गॅसोलिन तयार होते. येत्या चार ते पाच वर्षांत गॅसोलिन वापराचे प्रमाण आपल्याकडे वाढणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.

इथेनॉलची तीन वर्षातील मागणी व पुरवठा (लिटरमध्ये)

- वर्ष --- मागणी --- पुरवठा

- २०२०-२१ --- १०८ कोटी --- ९७ कोटी

- २०२१-२२ --- १२० कोटी --- १०२ कोटी

- २०२२-२३ --- १३२.३२ कोटी --- ४८.११ कोटी

- एकूण मागणी --- ३६०.३२ कोटी --- २४७.११ कोटी

प्रकल्प दृष्टिक्षेपात

१६३ - राज्यातील इथेनॉल निर्मिती प्रकल्प

५४ - सहकारी साखर कारखान्यांचे प्रकल्प

७१ - खासगी साखर कारखान्यांचे प्रकल्प

३८ - स्वतंत्र (स्टँड अलोन) प्रकल्प

२१,३७१ कोटी - इथेनॉल निर्मिती प्रकल्पात गुंतवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com