190 वर्षांनंतर वारकऱ्यांच्या दृष्टीने परमानंदाची गोष्ट; ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका येणार एकत्र 

अभय जोशी
सोमवार, 1 जून 2020

335 वर्षांपासून पादुका एकत्रित आणण्याची परंपरा 
सुमारे 335 वर्षांपूर्वी ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रितपणे पंढरपूरला पालखी सोहळ्यासोबत नारायण महाराजांनी आणल्या होत्या. या परंपरेत 1830 पासून खंड झाला होता. कोरोना पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या सद्यःपरिस्थितीत यंदा ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रितपणे येणे ही निश्‍चितच ऐतिहासिक घटना ठरणार असून ती सर्व वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : आषाढीच्या सोहळ्यासाठी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका एकत्रितरीत्या पंढरपूरला आणल्या जात असत. 1830 मध्ये ही परंपरा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा तब्बल 190 वर्षांनंतर ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुका एकत्रितरीत्या आल्यास वारकऱ्यांच्या दृष्टीने निश्‍चितच परमानंदाची गोष्ट असणार आहे, अशी प्रतिक्रिया श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. बाळासाहेब महाराज देहूकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 
श्री. देहूकर म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्यःपरिस्थितीत पायी पालखी सोहळ्याऐवजी दशमीदिवशी हेलिकॉप्टर, विमान अथवा बसमधून श्री संत ज्ञानेश्‍वर, श्री संत तुकाराम, श्री संत सोपानकाका, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत मुक्ताबाई तसेच श्री संत चांगावटेश्‍वर आणि कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थानच्या पादुका पंढरपूर येथे आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. श्री संत ज्ञानेश्‍वर आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका यानिमित्ताने एकत्रितपणे हेलिकॉप्टरमधून आणण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याची बातमी आजच्या "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी वाचूनच आम्हा सर्व वारकऱ्यांना कमालीचा आनंद झाला. जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे सदैह वैकुंठगमन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी 1685 मध्ये हा पालखी सोहळा सुरू केला. ज्येष्ठ वद्य सप्तमी या दिवशी श्री क्षेत्र देहू येथे श्री तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान होत असे आणि ती पालखी श्री क्षेत्र आळंदी येथे आणून श्री ज्ञानेश्‍वर महाराजांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमी या दिवशी होऊन या दोन्ही संतांच्या पादुका एकत्रितपणे पालखीत ठेवून ज्ञानोबा-तुकाराम असे भजन करत हा पालखी सोहळा मोठ्या वैभवाने पंढरपूरला आणण्याचे महान कार्य तपोनिधी श्री नारायण महाराज यांनी सुरू केले होते. त्यामुळेच देहूचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य सप्तमीला आणि आळंदीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला होत होते. पुढे 1830 मध्ये श्री हैबतबाबांनी आळंदीहून श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा स्वतंत्रपणे सुरू केला. परंतु प्रस्थानाच्या तिथीमध्ये बदल केला नाही. श्री नारायण महाराजांच्या काळात पंढरी क्षेत्रातील आषाढी यात्रेचा सोहळा झाल्यानंतर पौर्णिमेचा काला करून हा पालखी सोहळा पुन्हा परतीचा प्रवास करत असे. 
त्या वेळी नारायण महाराज हा सोहळा घेऊन प्रथम आळंदीला जात आणि श्री माउलींच्या पादुका तेथे ठेवून नंतर श्री तुकोबारायांच्या पादुकांच्या सह हा सोहळा श्री क्षेत्र देहू येथे परत येत असे. आजही श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा आषाढ वद्य दशमीदिवशी आळंदीला जातो आणि जगद्‌गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा आषाढ वद्य एकादशीला श्री देहू क्षेत्रामध्ये पोचतो. आजही या तिथीत बदल झालेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 190 years later the palkhis of dnyanoba Tukoba will come together in pandharpur