गावात भूजल वाढवा, ५० लाखांचे बक्षीस मिळवा

राज्यात भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा जाहीर; सहभागासाठी मंगळवारपर्यंत मुदत
1st prize rs 50 lakh for ground water rich village competition
1st prize rs 50 lakh for ground water rich village competition sakal

पुणे : लोकसहभागातून आपापल्या गावातील घटलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी राज्यात दोन वर्ष कालावधीसाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेत समाविष्ट असलेल्या गावांपुरती मर्यादित आहे.

त्यामुळे या योजनेत राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील १ हजार ४४२ गावांनाच सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रत्येकी गुणानुक्रमे पहिल्या तीन गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

यामध्ये जिल्ह्यात प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे तर, राज्यात अव्वल ठरलेल्या गावास १ कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गावांनी येत्या मंगळवारपर्यंत (ता.२५) प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक आहे.

केंद्र पुरस्कृत अटल भूजल योजनेत पुण्यासह राज्यातील तेरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यांसह नाशिक, नगर व जळगाव, नागपूर, अमरावती, बुलडाणा, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांचा समावेश असल्याचे राज्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितले.

अटल भूजल योजनेत पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर या तीन तालुक्यांमधील १०५ ग्रामपंचायतींमधील ११८ गावांचा समावेश असल्याचे पुणे जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे यांनी सांगितले.

जमिनीतील पाण्याचा बेसुमार उपसा झाल्यामुळे देशातील हजारो गावांमधील भूजल पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विंधनविहिरींची खोदाई हे यामागचे प्रमुख कारण आहे. अशा गावांमधील भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०२० पासून अटल भूजल योजना सुरु केली आहे.

या योजनेत राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील १ हजार ४४२ गावांचा समावेश आहे. राज्यातील एकूण गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील ११८ गावांचा समावेश आहे. ही पुरस्कार योजना फक्त सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोनच आर्थिक वर्षांपुरती मर्यादित असणार आहे.

या पुरस्कार योजनेत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी ५० लाख, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या गावांना ३० लाख आणि तृतीय क्रमांकास २० लाख रुपयांचे आणि राज्यात अव्वल ठरणाऱ्या गावास एक कोटी, द्वितीय क्रमांकास ५० लाख आणि तृतीय क्रमांकाच्या गावास ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. शिवाय या सर्व गावांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दोन वर्षात ८४ गावांना पुरस्कार देणार

या स्पर्धेतून प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून गुणानुक्रमे पहिले तीन असे राज्यातील तेरा जिल्ह्यांमधून ३९ पुरस्कार आणि राज्यस्तरीय तीन असे एकूण एका वर्षात ४२ गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

त्यानंतर दुसऱ्या वर्षीही तेवढीच गावे पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. यानुसार दोन वर्षात राज्यातील एकूण ८४ गावांचा भूजल समृद्ध ग्राम पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com