जिल्ह्यातील 2 'IAS' अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्यांना आशा! ग्रामविकासाच्या मंदिरात ‘सरस्वस्ती’ची पुनर्प्रतिष्ठापना व्हावी एवढीच ‘मनीषा’

सोलापूरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर थेट भारतीय प्रशासकीय सेवेतून निवडलेल्या दोघांची नेमणूक झाली. या पदावर प्रथमच नेमणूक असल्याने त्यांना प्रशासनातील कच्च्या दुव्यांवर प्रहार करताना आव्हानांचे डोंगर पार करावे लागणार आहे.
zp ceo manisha awhale and collectorkumar aashirwad
zp ceo manisha awhale and collectorkumar aashirwadsakal

सोलापूर : सोलापूरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर थेट भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) निवडलेल्या दोघांची नेमणूक झाली आहे. या दोघांची या पदावर प्रथमच नेमणूक असल्याने त्यांना प्रशासनातील कच्च्या दुव्यांवर प्रहार करताना आव्हानांचे डोंगर पार करावे लागणार आहेत. बरबटलेल्या शिक्षण विभागापासून स्वच्छता मोहिमेस सुरवात केल्याने नव्या सीईओंकडून अपेक्षा वाढल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या मंदिरात ‘सरस्वती‘ची पुनर्प्रतिष्ठापना होण्याची ‘मनीषा‘ आहे.

भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान उच्च आहे. जे गुरुजी बालमनांवर मूल्य संस्कार रुजवितात ते त्यांची कामे करून घेण्यासाठी (प्राथमिक व माध्यमिक) त्या मूल्यांचे जतन करतात. अनेकवेळा इच्छेविरुद्ध काही गुरुजींना (अपवादात्मक) सिस्टीम सांभाळण्यासाठी काही प्रसंगात मूल्ये अगदी पायदळी तुडवावी लागली. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान भयंकर असल्याने गुरुजी विद्यार्थ्यांना हे ज्ञान सांगूही शकत नसावेत. शिक्षकांच्या या मंदिरातील सरस्वस्तीची जागा ‘माया’ने घेतली आहे. या मंदिरातून निघून गेलेल्या सरस्वस्तीची पुनर्प्रतिष्ठापणा व्हावी, पुस्तकातील मूल्य व्यावहारिक जीवनातही खरे ठरतात, हे विद्यार्थ्यांना ठासून सांगता येईल एवढा आत्मविश्‍वास जिल्हा परिषदेच्या गुरुजींमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

नवे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे खडकपूर येथून आयआयटी झालेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आलेल्या मनीषा आव्हाळे या पुण्यातील नामांकित आयएलएस महाविद्यालयातून वकिलीचे शिक्षण घेतलेल्या आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद बिहारमधील गोपालगंजसारख्या भागातून तर मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे या विदर्भातील सायखेडा (ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) या सारख्या बिकट स्थिती असलेल्या भागातून आलेल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना ग्रामीण भागाची आणि गरिबांची चांगली जाणीव असणार आहे. दोघांनाही राज्याच्या प्रशासनात मोठ्या पदावर जाण्याची खूप मोठी संधी आहे. ही संधी गाठण्यासाठी त्यांची सोलापुरातील टर्म ‘टर्निंग पॉइंट ठरू शकते. सोलापुरात यशस्वी होऊन टिकण्यासाठी त्यांना प्रशासनातील काही आव्हाने पेलावी लागणार आहेत.

शिक्षण, आरोग्य, प्रशासन, समाजकल्याण आणि ग्रामपंचायत विभाग सरळ झाला की निम्म्याहून अधिक झेडपी सुतासारखी सरळ होते. एक महिन्याच्या (प्रभारी) सीईओ म्हणून आव्हाळे जलजीवनची गाडी अशीच सुसाट करून दाखविली होती. त्यामुळे आव्हाळे यांना झेडपीचा अंदाज आणि झेडपीला आव्हाळेंचा अंदाज यापूर्वीच आलेला आहे. या विभागात सुरु असलेल्या ‘वायदे बाजारावर' आजपर्यंत फारसा कटाक्ष टाकला गेला नाही. कारण या विभागात ‘तेरी भी चूप...’च्याच कारभाराची प्रचिती येत होती. झेडपी असो की महसूल या दोन्ही यंत्रणेत एकटा काहीच करू शकत नाही, विकासाचा रथ ओढण्यासाठी विश्‍वासू अधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची टिम आवश्‍यकच आहे. ही टिम या दोन्ही अधिकाऱ्यांना कधीपर्यंत जमते? यावर देखील बरेच काही अवलंबून आहे.

गुणवत्तापूर्ण शाळांचे काय?

दैनिक सकाळमधून ‘माझी शाळा गुणवत्तापूर्ण शाळा‘ या मालिकेद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर टाकलेल्या प्रकाशामुळे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा पट वाढला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना याचा मोठा अभिमान होता. परंतु, आता मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पट कमी झाल्याने तब्बल तीन हजार शिक्षक घटल्याची गंभीर बाब समोर आली आहे. गेल्या सहा वर्षात ९० हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेची शाळा सोडून गेले आहेत. या शाळांमध्ये गुणवत्ता वाढल्याशिवाय पट वाढणार नाही. शिक्षकांचे प्रश्‍न झेडपीत सहजासहजी आणि थेटपणे मार्गी लागल्यास माझी झेडपी ही भावना आपसूकच वाढीला लागेल असा विश्‍वास वाटतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com