
Winter Session : महिलांची शोधाशोध संपणार! सार्वजनिक पार्किंगमध्येही आता महिलांसाठी राखीव जागा
नागपूर - राज्याच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनात अनेक विषयांवार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होताना दिसत आहे. मात्र अधिवेशनात काही चांगले निर्णयही घेण्यात आले आहेत. त्यातच महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. (Winter Session news in Marathi)
महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत घोषणा केली की, राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमधील 20 टक्के जागा महिला चालकांसाठी राखीव ठेवली जाईल. सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी गाडी लावताना महिलांना अनेकदा जागेची शोधाशोध करावी लागते. तसेच गाड्या बाजुला सरकवून आपली गाडी लावण्यात मर्यादा येतात. यामुळे महिलांचा सार्वजनिक ठिकाणी गाडी लावतानाचा त्रास कमी होणार आहे. याआधी महिलांसाठी बसमध्ये बसण्यासाठी जागा आरक्षित होती. आता पार्किंगमध्येही महिलांना आरक्षण मिळालं आहे.