आणखी 25 हजार घरांची योजना - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - सिडकोतर्फे "सर्वांसाठी घरे' धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी महागृहनिर्माण योजनेत साकारण्यात येणाऱ्या 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाइन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पुढच्या टप्प्यात आणखी 25 हजार घरांची सोडत वर्षअखेरीस जाहीर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देऊन पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने एक लाख घरे बांधण्यांचे उद्दिष्ट ठेवावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी पंतप्रधान आवास योजनेची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या या योजनेत महाराष्ट्र राज्याने 6.50 लाख घरे बांधून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. राज्यात मुंबई व मुंबई महानगर परिसरात सर्वात जास्त घरांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत.

म्हाडाला पीपीपी योजनेतून 1 लाख घरे मिळणार आहेत. तसेच घरांसाठी संयुक्त भागीदारी मंजूर केली आहे. घरांच्या या योजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही 14 हजार घरांची योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना चांगल्या किमतीत व चांगल्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह घरे मिळणार आहेत,' असे फडणवीस म्हणाले.

Web Title: 25000 home scheme chief minister sidco