महाराष्ट्रात ‘एवढ्या’शाळा झाल्या तंबाखूमुक्त...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

३१ मे 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. या पर्श्वभूमीवर मंत्री टोपे यांनी ट्विट केले आहे.

महाराष्ट्रात २६ हजार ४१८ शाळा आणि २४४२ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे सहा कोटी ५४ लाख २४ हजार ४३० इतका दंड वसूल केल्याचेही त्यांनी सांगितले. 

३१ मे 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून पाळला जातो. या पर्श्वभूमीवर मंत्री टोपे यांनी ट्विट केले आहे. राज्यात हुक्का बंदीही लागू करण्यात येईल. मौखिक कर्करोग तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात येते आहे. राज्यातील २२४ तंबाखू मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार केले आहेत. तर २५ हजार २७५ जण तंबाखू मुक्त झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केल्याची माहितीही त्यांनी दिली.

तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: १० लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणतः ३६ टक्के पुरुष व पाच टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने अनेकांचा बळी जातो. प्रत्येक तंबाखू खाणारा व्यक्ती तंबाखू आवड म्हणून नाहीतर गरज म्हणून खात असतो. आपल्या आजूबाजूला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे अनेक लोक आहेत. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी आपण नेहमीच पाहतो.  धूम्रपान करणे हे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे, हे आपण सर्वजणच जाणतोच. तंबाखू पहिल्यांदा, दुसऱ्यांदा खाल्यावर काही होत नाही, परंतु तिसऱ्यांदा तंबाखूचे सेवन केल्यास त्यातील निकोटीन आणि टार खाल्यानंतर त्यातील निर्माण झालेल्या लाळेतून ती लाळ रक्तात मिसळण्यासाठी २० मिनीटे लागतात. रक्तातील निकोटीनच्या पूर्ततेसाठी ४५ मिनीटाला एक विडा लागतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात. परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 thousand 418 schools and 2442 health institutions in Maharashtra are tobacco free