महाराष्ट्र राज्यातील ३ शाळांना ‘राष्‍ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School

महाराष्ट्रातील तीन शाळांना २०२१-२२ च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ ने दिल्लीत आज सन्मानित करण्यात आले.

School Award : महाराष्ट्र राज्यातील ३ शाळांना ‘राष्‍ट्रीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील तीन शाळांना २०२१-२२ च्या ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कारा’ ने दिल्लीत आज सन्मानित करण्यात आले. सर्वसाधारण गटातील ३४ पारितोषिक विजेत्या शाळांना प्रत्येकी ६० हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील ५ शाळांना २०-२० हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह आदी उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्ल‍िश मिडीयम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्ल‍िक स्कूल या शाळांचा समावेश आहे. त्या-त्या शाळांचे प्राचार्यांसोबत व कांही विद्यार्थी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.

यंदाच्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील ३९ शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये ३४ तर उपश्रेणींमध्ये ५ शाळांची निवड करण्यात आली. यात १७ प्राथमिक आणि २२ माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. निवड झालेल्यांपैकी २१ शाळा ग्रामीण भागातील तर १८ शहरी भागातील, २८ अनुदान‍ित, ११ खाजगी, २ कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, १ नवोदय विद्यालय आणि ३ केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे.

राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कारातंर्गत सहा मानकांवर देशभरातील शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. शाळांतील स्वच्छतागृहांत पाणी सुविधा, शौचालये संख्या, हाथ धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड-19 च्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मुल्यांकन झाले.

टॅग्स :maharashtraschoolaward