आरोग्य विभागात 3 हजार 824 हंगामी पदे भरणार 

प्रमोद बोडके
Saturday, 11 July 2020

जिल्ह्यासाठी रेमिडिसिव्हीरचे 18 इंजेक्‍शन 
जिल्ह्यातील गंभीर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यशासनाकडून अठरा रेमिडिसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध करुन दिली असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले आहे. राज्यशासनाकडून गंभीर कोविड रुग्णांवर स्टॅडर्ड ट्रिटमेंट प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यानुसार गंभीर गरीब रुग्णांना मदतीच्या हेतूने रेमिडिसिव्हीर अठरा इंजेक्‍शन जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आली आहेत. 

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून दक्षता घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागावरील अधिकचा ताण कमी करण्यासाठी तसेच कोरोना नियंत्रणासाठी हंगामी कालावधीसाठी विविध प्रवर्गातील तीन हजार 824 पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

शासनाकडून आलेल्या प्रस्तावानुसार मानधनावर हंगामी कालावधीकरिता ही भरती केली जात आहे. कोविड निगा केंद्र, समर्पित कोविड आरोग्य केंद्र, समर्पित कोविड रुग्णालयात विविध पदांसाठी रिक्त पदांची भरती होणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी 454 पदे, फिजिशियन 104, भूलशास्त्रज्ञ 71, आयुष वैद्यकीय अधिकारी 443, आरोग्य सेवक 2 हजार 683 तर एक्‍स-रे तंत्रज्ञाच्या 69 पदांची भरती होणार आहे. 17 ते 75 हजार रुपयांपर्यंत पदानुसार यासाठी मानधन दिले जाणार आहेत. 

पात्र व इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या www.zpsolapur.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा. तो अर्ज भरून आवश्‍यक कागदपत्रांसह स्कॅन करून पीडीएफमध्ये covidsolapur2020@gmail.com या ईमेल आयडीवर 13 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावा. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व त्यासंदर्भात आवश्‍यक माहिती उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 thousand 824 seasonal posts will be filled in the health department