
Pollution : राज्याच्या उपराजधानीत ३०३ दिवस प्रदूषित
नागपूर : उपराजधानीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या ३६५ दिवसांच्या हवा गुणवत्ता निरीक्षणाची आकडेवारी धक्कादायक आहे. ३६५ दिवसांपैकी ३०३ दिवस शहरातील हवा प्रदूषित असल्याचे दिसत आहे.
केवळ ५८ दिवस प्रदूषण मुक्तीचे ठरले. १६५ दिवस कमी प्रदूषणाचे, १०१ दिवस जास्त प्रदूषणाचे आणि ३७ दिवस आरोग्यासाठी हानिकारक होते. मागील काही वर्षांपासून नागपूरचे प्रदूषण वाढते आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे ही धक्कादायक आकडेवारी पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. शहरात पाच ठिकाणी सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते.
उपलब्ध आकडेवारी ही सिव्हिल लाइन्स येथील जी पी ओ येथील आहे. ही नोंद शासकीय यंत्रणेद्वारे घेतलेली असली तरी अनेक ठिकाणी यापेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते.
प्रदूषणाचे स्रोत
वाहतूक, वाहने आणि औष्णिक ऊर्जा केंद्रे, उद्योगांमुळे हवेचे प्रदूषण होत असते. पण आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि बाहेर सर्वच ठिकाणी हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाहनांचा धूर आणि धूळ, कचरा ज्वलन, लाकूड, कोळसा ज्वलन हे याचे स्रोत आहे.
प्रदूषण निर्देशांक
० - ५० - चांगला
५१ - १०० - साधारण प्रदूषित
१०१- २०० - प्रदूषित
२०१-३०० - अति प्रदूषित
३०१-४०० - धोकादायक
ऋतूनिहाय प्रदूषण
पावसाळा : पावसाळा हा सर्वाधिक कमी प्रदूषणाचा काळ असतो. मागील वर्षांतील चार महिन्याच्या आकडेवारीत पावसाळ्यात सुद्धा प्रदूषण आढळले. जून महिन्यात २६, जुलै महिन्यात सहा, ऑगस्टमध्ये १७ दिवस आणि सप्टेंबरमध्ये २३ दिवस साधारण ते माफक प्रदूषणाची नोंद झाली आहे. पावसाळ्यातील चार महिन्यातील १२२ दिवसांपैकी ७२ दिवस प्रदूषण होते.
हिवाळा : अलीकडे सर्व शहरे प्रदूषित झाल्यामुळे आरोग्यदायी मानला जाणारा हा ऋतूही प्रदूषणामुळे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू लागला आहे. नागपुरात या ऋतूतील ऑक्टोबरमध्ये २८, नोव्हेंबरमध्ये २९, डिसेंबरमध्ये ३० दिवस अतिशय जास्त प्रदूषण होते. जानेवारीत एकूण ३१ दिवसांपैकी २७ दिवस प्रदूषण आढळले. हिवाळ्यातील एकूण १२३ दिवसांपैकी ११५ दिवस प्रदूषण होते.
उन्हाळा : उन्हाळ्यातील फेब्रुवारी, मार्च एप्रिल,मे या चार महिन्यात जास्त प्रदूषण आढळले. फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यात सर्वच दिवस प्रदूषण होते. एप्रिल महिन्यात २९ दिवस तर मे महिन्यात २८ दिवस प्रदूषण होते. उन्हाळ्यातील १२० दिवसांपैकी ११७ दिवस प्रदूषण होते.