ऊस संपल्याने 42 कारखाने बंद

- निवास चौगले
बुधवार, 11 जानेवारी 2017

कोल्हापूर - दुष्काळ व कमी पावसामुळे राज्यातील घटलेल्या ऊस क्षेत्राचा फटका साखर कारखान्यांना बसण्यास सुरवात झाली आहे. या वर्षी 8 जानेवारीअखेर केवळ पुरेसा ऊस नसल्याने कोल्हापूर विभागातील दोन कारखान्यांसह राज्यातील 42 कारखान्यांवर धुराडी बंद करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर - दुष्काळ व कमी पावसामुळे राज्यातील घटलेल्या ऊस क्षेत्राचा फटका साखर कारखान्यांना बसण्यास सुरवात झाली आहे. या वर्षी 8 जानेवारीअखेर केवळ पुरेसा ऊस नसल्याने कोल्हापूर विभागातील दोन कारखान्यांसह राज्यातील 42 कारखान्यांवर धुराडी बंद करण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, 16 जानेवारीपर्यंत बंद होणाऱ्या कारखान्यांची संख्या दुप्पट होण्याची शक्‍यता आहे. सोलापूरसह, नगर, मराठवाडा विभागातील हंगामच संपेल; तर पुणे जिल्ह्यातील काही कारखानेही बंद पडतील अशी स्थिती आहे. गेल्या वर्षी राज्यात 93 सहकारी व 74 खासगी कारखान्यांनी हंगाम घेतला होता. या वर्षी यापैकी 6 सहकारी व 12 खासगी असे 18 कारखाने सुरूच झालेले नाहीत. त्यामुळे चालू हंगामात 87 सहकारी व 62 खासगी कारखान्यांनी हंगाम घेतला आहे.

या वर्षी घटलेले ऊस क्षेत्र, पाण्याची कमतरता, त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत राज्यात 460 लाख टन गाळप व सुमारे 50 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. गेल्या वर्षी राज्यात 760 लाख टन गाळप व 84 लाख टन साखर उत्पादन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गाळप 300 लाख टनांनी तर साखर उत्पादन 30 ते 35 लाख टनांनी घटणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी साखरेचे उत्पादन घटल्याने ऑक्‍टोबर 2017 मध्ये कारखान्यांकडे केवळ दोन महिने पुरेल एवढाच साखर साठा शिल्लक राहणार आहे. उत्पादनच घटल्याने साखरेला आज प्रतिक्विंटल 3500 रुपये दर मिळत आहे. हा दर आणखी वाढण्याची शक्‍यता असली तरी पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्र सरकारकडून साखरेच्या दरावर नियंत्रण आणले जाईल, अशी भीती या उद्योगातून व्यक्त होत आहे. सरकारने नियंत्रण आणले तर मात्र कारखान्यांची पुन्हा आर्थिक कोंडी होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातही उसाची कमतरता जाणवू लागल्याने तेथील कारखानेही बंद होत आहेत.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
साखरेच्या दरात नैसर्गिकरीत्या वाढ होत असताना सरकार मात्र त्यावर निर्बंध आणण्याच्या विचारात आहे. मंदीच्या काळात कमी दराने कारखान्यांनी साखर विकली. सरकारने दिलेल्या कर्जाचे हप्ते आता सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत 60 ते 70 टक्के हंगाम घेतलेल्या कारखान्यांना होणारा फायदा निर्बंध आणल्यास मिळणार नाही. जुनी देणी, सरकारच्या कर्जाची परतफेड अवघड होणार आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे या उद्योगाचे लक्ष आहे.

दृष्टिक्षेपात राज्याचा हंगाम (8 जानेवारीपर्यंत)
विभागाचे नाव हंगाम घेतलेले कारखाने ऊस गाळप (लाख टन) साखर उत्पादन (लाख क्विं.) बंद कारखाने
सहकारी खासगी

कोल्हापूर 28 11 97.60 114.47 2
पुणे 28 24 105.07 109.70 15
नगर 14 9 33.86 32.04 9
औरंगाबाद 9 8 19.12 16.56 7
नांदेड 7 4 9.84 9.56 6
अमरावती 1 2 2.43 2.37 3
नागपूर 0 4 2.50 2.37 0
एकूण 87 62 270.43 287.06 42

तुलना 2015-16 93 74 361.03 379.60 --(8 जानेवारीपर्यंत)

Web Title: 42 sugar factory close