Vidhan Sabha 2019 : राज्यात ४३ लाख बोगस मतदार - ॲड. आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून, त्यांनी ईव्हीएमबरोबरच आता ४३ लाख बोगस मतदार तयार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधानसभा 2019 : मुंबई - सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी सर्व पर्याय शोधत असून, त्यांनी ईव्हीएमबरोबरच आता ४३ लाख बोगस मतदार तयार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. मुंबईत आंबेडकर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील प्रत्येक मतदाराला इपिक क्रमांक दिला जातो, तो इतर दुसऱ्या कुठल्याही मतदाराला दिला जात नाही. असे असतानाही राज्यात ४३ लाख बोगस मतदार तयार करण्यात आले असून, त्यांची नोंदणी झाली आहे. एकाच इपिक  क्रमांकावर दोन मतदार दाखविण्यात आल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. ही सर्व माहिती आयोगाला देण्यात येणार आहे. निवडणूक जवळ आल्यावर मतदार यादी पाहणाऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे मतदार यादी वंचित आघाडीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रचारासाठी काँग्रेसचे ऊर्मिलांकडे साकडे
मुंबई - काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून रामराम ठोकणाऱ्या ऊर्मिला मातोंडकरांची पुन्हा काँग्रेसला आठवण झाली आहे. ऊर्मिला मातोंडकर यांनी विधानसभेच्या प्रचाराला यावे, यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मातोंडकरांशी संपर्क साधला आहे. त्यांनी मातोंडकरांना विधानसभाच्या प्रचाराला येण्याची गळ घातली आहे.

रिपाइंचे सोनवणे अर्ज मागे घेणार
मुंबई - रिपब्लिकन पक्ष-आठवले गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. या वेळी सोनवणे उपस्थित होते. त्यापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आठवले यांच्यात चर्चा झाली. राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत तेथे रिपाइंच्या उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत उद्धव आणि आठवले यांच्यात चर्चा झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43 lakh bogus voters in state prakash ambedkar politics