सोलापूरच्या ग्रामीण भागात मास्क न वापणाऱ्या 4415 व्यक्तींना दंड 

प्रमोद बोडके
Sunday, 12 July 2020

नगरपरिषदांना दिसेनात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, दारू सेवन करणारे 
सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन करणाऱ्या 191 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तहसील कार्यालयाच्यावतीने 74 जणांवर तर पोलिसांनी 117 जणांवर कारवाई केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकाही नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतीने याबाबतची कारवाई केलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू सेवन करणारे कोणीही नगरपालिकेला कसे आढळले नाही? याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर आणि चेहऱ्यावर मास्क/रुमालचा वापर ही महत्त्वाची त्रिसूत्री मानली जाते. सोलापूर जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून आर्थिक दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्यानंतर 6 ते 11 जुलै या कालावधीत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 4 हजार 415 जणांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असतानाही मास्क वापराबद्दल जनजागृती होताना दिसत नाही. 

ग्रामीण भागातील ग्रामपंचायती, नगरपरिषद/नगरपालिका/नगरपंचायत, पोलिस ठाणे व तहसील कार्यालय यांना या प्रकरणी कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मास्क न वापरणारी व्यक्ती, दुचाकीवर एकापेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या व्यक्ती, तीन चाकी वाहनात तीन व चारचाकी वाहनात चारपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या व्यक्ती, जिल्हा प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकान सुरू ठेवणाऱ्या व्यक्ती, साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकानांमध्ये आढळल्यास त्यांना दंड करण्याची सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे.

याशिवाय दुकानांमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती, योग्य रीतीने होम क्वारंटाईन न पाळणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्ती, दुकानदार/व्यावसायिक फिरते फळ व भाजी विक्रेते यांनी मास्क न वापरल्यास त्यांच्याकडून दंडापोटी आर्थिक रक्कम वसूल करण्याची सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार 6 जुलै ते 11 जुलै या कालावधीत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 17 हजार 453 जणांकडून 42 लाख 93 हजार सहाशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण केसेसमध्ये मास्क न वापरणाऱ्या 4 हजार 415 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4415 persons fined for not wearing masks in rural Solapur