Coronavirus : कोरोनाचे राज्यात थैमान; रुग्णांची संख्या...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 मार्च 2020

- ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षांत आतापर्यंत 304 जणांना दाखल.

पुणे : ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील विलगीकरण कक्षांत आतापर्यंत 304 जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने ‘कोरोना’करिता निगेटिव्ह आले असून, त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले; तर पाच जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 12 जणांना पुण्यात; तर तिघांना मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत एक हजार १०१ विमानांमधील एक लाख २९ हजार ४४८ प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांनी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशांत सध्या कोरोना विषाणूंचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 

नवीन ‘कोरोना’ विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालये; तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ खाटा उपलब्ध आहेत. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा उद्रेक झालेल्या १२ देशांमधून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी आरोग्य विभागास दैनंदिन स्वरूपात देण्यात येते.

बाधित भागातून राज्यात आलेल्या ५९१ प्रवाशांपैकी ३५३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला. मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, वर्धा, सांगली, नगर, अमरावती, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यांतूनही बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 peoples test positive in Maharashtra