साडेपाच हजार कोटींची एफआरपी थकली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

सोलापूर - राज्यातील 73 कारखान्यांकडे तब्बल पाच हजार 320 कोटी 36 लाखांची एफआरपी थकली आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या 39 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याच्या साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली.

सोलापूर - राज्यातील 73 कारखान्यांकडे तब्बल पाच हजार 320 कोटी 36 लाखांची एफआरपी थकली आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या 39 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याच्या साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली.

राज्यात दिवसेंदिवस दुष्काळ तीव्र होत असतानाच शेतकऱ्यांची खरीप व रब्बीची पिके वाया गेली. दुसरीकडे शेतमालाचे दरही गडगडल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची एफआरपी देण्याऐवजी साखरेचे दर अस्थिर आहेत, कारखाने चालविणे कठीण असल्याची उत्तरे कारखानदारांकडून दिली जात आहेत. राज्यातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे सर्वाधिक एफआरपी थकली आहे. कारखानदारांच्या अडचणींबाबत 23 जानेवारीला साखर आयुक्‍तालयात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या कारखानदारांची सुनावणी होणार असल्याचे आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.

एफआरपीची स्थिती
एकूण एफआरपी - 10487.34 कोटी
थकीत एफआरपी - 5320.36 कोटी

इथेनॉल निर्मितीचे मृगजळ
साखरेऐवजी बी-मोलॅसिसपासून थेट इथेनॉल निर्मिती करावी, त्यासाठी सरकारकडून अनुदानही देण्यात येत आहे, असे केंद्राकडून आवाहन केले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर 50 लाख लिटर इथेनॉलसाठी ई-टेंडर भरल्यानंतर एकूण टेंडरच्या 15 टक्‍के इथेनॉलला परवानगी मिळाल्याची माहिती मोहोळ (जि. सोलापूर) येथील लोकनेते शुगरचे संस्थापक राजन पाटील यांनी दिली. त्यातच साखरेचे अस्थिर दर आणि निर्यातीचे फसलेले धोरण, यामुळे साखर कारखानदारांपुढे अडचणी निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5500 Crore FRP Arrears Sugar Factory